नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात दिवाळीच्या सुट्यांमध्ये चोरट्यांनी चांगलात हात साफ केला आहे. त्यामुळेच अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीमध्ये अडीच लाखांची चोरी झाली आहे. तर, शहरातून दुचाकींची चोरी होण्याचा सिलसिला कायम आहे. आताही दोन दुचाकी लांबवण्यात आल्या आहेत.
अंबडला अडीच लाखांची चोरी
औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यातील वर्कशॉपच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी सुमारे २ लाख ५६ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात कॉपर आणि अॅल्युमिनीअम वायर,झिंक, टिन व निकेल प्लेट तसेच मॉडम,राऊटर हॅण्ड ग्रॅण्डरचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र गौरीशंकर झा (रा.भावगंगा सोसा.आनंदनगर,कामटवाडे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. झा यांची औद्योगीक वसाहतीतील गंगाविहार हॉटेल परिसरात निलेश इंडस्ट्रीज नावाचा कारखाना आहे. शनिवारी (दि.२९) साप्ताहीक सुट्टीनिमित्त कारखाना बंद असतांना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या वर्कशॉपच्या मागील खिडकीचे गज वाकवून कारखाना आवारातील ९० किलो वजनाची कॉपर तर ६२ किलो अॅल्युमिनीअम वायर तसेच १४० किलो वजनाची झिंक प्लेट,१७ किलो वजनाची टिन प्लेट,१५ किलो वजनाची निकेल प्लेट आणि मॉडम,राऊटर व हॅण्ड ग्रॅण्डर असा सुमारे २ लाख ५६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.
मोटार सायकल चोरी सुसाट
शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी गंगापूर आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रमिकनगर भागातील स्वप्नील रेहरे हे गेल्या शनिवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास सिटीसेंटर मॉल येथे गेले होते. नासर्डी नदी लगतच्यालक्ष्मी मंदिराजवळ त्यांनी आपली यामाहा एमएच १५ व्हीएच १६३१ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
दुसरी घटना सातपूर येथील खोडे पार्क येथे घडली. आप्पासाहेब माधवराव मोकाटे (रा.खोडे पार्क,सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मोकाटे यांची पल्सर एमएच १५ एचटी ७३५१ गेल्या बुधवारी (दि.१९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
Nashik Diwali Crime Dacoity Two Wheeler Theft