प्रशिक्षणातून कार्यक्षमता वृद्धी
प्रशासकीय कामकाजात प्रशिक्षण अथवा प्रशिक्षण संस्था हा तसा सर्वसामान्य जनतेला फारसा माहीत नसलेला विषय समजला जातो. तथापि, प्रशासकीय कामकाजात गतिमानता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशासकीय कायदे, कार्यपद्धती व नियमावली यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्वाचे असते. कारण तंत्रज्ञानात जसे सतत बदल होतात, तसे प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीमध्येही काळानुरूप बदल होत असतात. नाशिक विभागीय आयुक्त पदाची सूत्रे राधाकृष्ण गमे यांनी सप्टेंबर 2020 मध्ये स्वीकारल्यानंतर या प्रशासकीय कामकाजातील प्रशिक्षणाची गरज ओळखून विविध प्रशासकीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यास प्राध्यान्य दिले. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी ही संस्था गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत आहे. सन 2014 पासून या संस्थेस विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे.
या प्रशिक्षण संस्थेत महसूल, कृषि, ग्रामीण विकास आणि वित्त विभाग तसेच आदिवासी विभागासह शासनाच्या सर्व प्रमुख विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना दैनंदिन प्रशासकीय कामकाज विषयक प्रशिक्षण दिले जाते. तलाठी, लिपीक पासून तहसिलदार व उपजिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जाते. विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने सन 2014 पासून मागील आठ वर्षात एकूण 17,495 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. मागील वर्षभरात देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रभाव असतानाही नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी मध्ये 2843 अधिकारी व कर्मचा-यांना शासकीय कामकाजाबाबत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यामध्ये प्रशासनातील कायदे, नियम, शिस्त, नीतीमूल्य व ध्येये यासह संवाद कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन आणि ताणतणाव व्यवस्थापन यासारख्या चाकोरी बाहेरच्या विषयांवरही भर देण्यात येतो.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यभर विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेमधून “प्रशिक्षणातून कार्यक्षमता वृद्धी” या शीर्षकाखाली नाशिक विभागातील धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर या पाचही जिल्हयातील विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना प्रशासकीय कामकाजासोबत शिस्त व गतिमानता याबाबत प्रशिक्षण दिले जात आहेत. नाशिक विभागातील अनुभवी, कार्यक्षम आणि व्यासंगी अधिकारी प्रशिक्षण वर्गासाठी व्याख्याते म्हणून काम करतात.
शासनाच्या प्रशासनाचा प्रमुख कणा असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक कामकाजाविषयक प्रशिक्षण देण्याची गरज ओळखून मागील वर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्हयातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार यांना अर्धन्यायिक कामकाज विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचा अत्यंत चांगला व सकारात्मक असा परिणाम प्रशासकीय कामकाजात दिसून येत आहे. भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील अधिका-यांना या प्रशिक्षण संस्थेत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण संस्थेमध्ये नियमित प्रशिक्षणा सोबत महिन्यातून दोन वेळा विविध महत्वपूर्ण विषयावर साधारणपणे दोन तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. आगामी वर्षात जवळपास 4,000 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे प्रशिक्षण संस्थेचे नियोजन आहे.
नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात असलेल्या या प्रशिक्षण संस्थेची वाटचाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि संस्थेच्या संचालिका गीतांजली बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अग्रगण्य संस्था म्हणून सुरु आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात सुमारे साडेसात एकर जागेवर प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या नवीन अदययावत इमारतीच्या बांधकामाचे नियोजन करण्याची कार्यवाही सध्या सुरु असून सदर इमारत पूर्ण झाल्यानंतर ही संस्था प्रशासकीय प्रशिक्षणामध्ये उत्तर महाराष्ट्राचे नव्हे तर राज्याचेही वैभव म्हणून पुढे येईल, यात शंका नाही. नाशिक विभागाचा हा प्रशिक्षक पॅटर्न राज्यभर नावारुपास येत आहे.
“विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमधील व नाशिक विभागातील समर्पित भावनेने काम करणा-या सर्व अधिकारी, व्याख्याते व कर्मचा-यांमुळे नाशिकची विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी राज्यातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था म्हणून नावारुपात येत आहे, याचा निश्चितच अभिमान आहे.”
– गीतांजली बाविस्कर, संचालिका, विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक
“प्रशासकीय कामकाजात प्रशिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे प्रशिक्षणाची गरज ओळखून विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने मागील दोन वर्षात आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गामुळे प्रशासनात कार्यक्षमता वृद्धी होण्यास व पारदर्शकता येण्यास मोठया प्रमाणावर मदत होत आहे.”
– राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक