पेठ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. आताही आज पेठ तालुक्यातील हरणगाव शिवारात एका युवकावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जनावरे चारण्यासाठी जात असतांना ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने या युवकावर हल्ला केला. त्यात रविंद्र वामन गावित (३३) या युवकाचा मृत्यू झाला.
रविवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली आहे. रविंद्र गावित हा गुरांना चारण्यासाठी जात असतांना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याने रविंद्रला जंगलात ओढून नेले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रविंद्रचा शोध घेतला. त्यानंतर दुपारच्या सुमारास रविंद्रचा मृतहेह विचित्र अवस्थेत आढळून आला.
याप्रकरणी पोलिस पंचनाम्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान स्थानिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे. याअगोदर बागलाण तालुक्यातील महड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी विश्वास अहिरे शेतातील पाहणी करण्यासाठी गेले असता दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांनी आरडा ओरड केली आणि ते घराकडे पळत असतांना पुन्हा मागून येत बिबट्याने पुन्हा हल्ला केला. घरातील लोक मदतीला येताच बिबट्या मात्र पळून गेला. यात विश्वास अहिरे जखमी झाले.
तर सिन्नर तालुक्यात दोन तर नाशिक शहरात एक घटना घडली अगोदर घडली आहे. तर निफाड तालुक्यातील एकाचवेळी दोन बिबट्यांनी दुचाकीस्वारावर थेट हल्ला केला होता. मानवी वस्तीकडे येणाऱ्या बिबट्यांनी आता थेट आक्रमक हल्ले सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Nashik District Youth Death Leopard Attack Paint
Rural Trible Forest Wild Animal Human Animal Conflict