येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील मानोरी बु येथील प्रगतशील शेतकरी तान्हाजी गुलाबराव शेळके यांच्या शेतातील टोमॅटो झाडाला असलेले टोमॅटो अज्ञात चोरट्यांनी काठीचे वार करून शेतातच टाकून दिल्याची घटना घडली आहे. यंदा टोमॅटोला चांगल्या प्रमाणात दर मिळत असताना अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना घडलेल्या असताना हा प्रकार समोर आला आहे. हे चोर टोमॅटो चोरायला आले. पण, टोमॅटो पाडून गेले त्यामुळे सर्वांना आश्चर्यही वाटले.
या घटनेबाबत समजेली माहिती अशी की, तान्हाजी शेळके यांनी आपल्या शेतात दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून टोमॅटो लागवड केली आहे. महागड्या दराने औषध खरेदी करून टोमॅटोचे यशस्वी उत्पादन घेत आहे. ते टोमॅटोला औषध मारण्यासाठी गेले असता टोमॅटोच्या सरीत टोमॅटो फळ मोठ्या प्रमाणात खाली पडलेले दिसून आले. दोन ते तीन सऱ्या मध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो तोडून टाकल्याचे दिसून आले. अज्ञात वस्तूच्या साहाय्याने टोमॅटोच्या झाडावर देखील मार बसल्याने झाडांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोमॅटोची एक गल्ली देखील वाकल्याचे निदर्शनास आले. या नुकसानीतून तान्हाजी शेळके यांचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी सरपंच नंदाराम शेळके, पोलीस पाटील आप्पासाहेब शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष बद्रीनाथ शेळके आदींनी घटनास्थळी पाहणी केली असून घटनेची माहिती येवला तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अधिक तपास येवला पोलीस करत आहेत.
वातावरणात होत असलेल्या बदला मुळे सध्या टोमॅटो पिकावर सातत्याने औषध फवारणी खते देण्याची काम करावी लागत आहे. शुक्रवारी रात्री टोमॅटो ला औषध फवारणी व खत देण्यासाठी गेलो असताना बॅटरीच्या प्रकाश झोतात टोमॅटो जमिनीवर पडलेले असल्याचे निदर्शनास आले. दोन ते तीन सऱ्या मध्ये हा टोमॅटो तोडून टाकल्याचा प्रकार घडून आला. यातून जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
Nashik District Yeola Tomato Theft Incidence
Rural Agriculture Farmer Crime