येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला येथील पथकाने १ कोटीचा मद्य साठा जप्त केला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गोवा निर्मित मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
येवला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला ही माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला. त्यानंतर मद्य साठा घेऊन येत असलेल्या कंटेनरचा पाठलाग करुन पकडले. कंटनेर चालकाला माहिती विचारण्यात आल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला.
त्यानंतर पथकाने कंटेनर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला त्यात गोवा बनावटीची दारू असल्याचे उघड झाले. कंटेनरसह १ कोटी नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी धुळे येथील कैलास लष्कर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Nashik District Yeola State Excise 1 Crore Liquor Seized