येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाह इच्छुक तरुणांना लग्नाचे आमीष दाखवून फसवणूक करणारी टोळी येवला तालुका पोलिसांनी जेरबंद केली आहे. येवला तालुक्यातील सायगाव व परिसरात काही तरुण विवाह इच्छुक होते. यातील तक्रारदार ज्ञानेश्वर देवराम खैरनार रा. गारखेडा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि ही टोळी जेरबंद झाली.
येवला तालुका पोलिसांनी पथक तयार करून नागपूर येथून शंकर जगन शेंडे (रा. गोंदेगाव ता. पारशिवनी, जि. नागपूर) या आरोपीला सिनेस्टाईल पद्धतीने वेशांतर करून अटक केली. यानंतर या आरोपीचे साथीदार असलेले योगेश पोपट जठार, अंजना योगेश जठार, सचिन प्रकाश निघोट, भाऊसाहेब दगू मुळे, सर्व राहणार सायगाव यांना अटक केली. काही महिला साथीदार फरार असून त्यांना देखील लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल शिरसागर यांनी दिली आहे.
येवला तालुक्यातील ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ येवला तालुका पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल शिरसागर, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस नाईक राजेंद्र बिंनर ,महिला पोलीस शिपाई सुनीता महाजन, पोलीस शिपाई आबा पिसाळ ,मुकेश जाधव आदींनी केली.
राज्यभरामध्ये एजंटगिरीचे जाळे
स्त्रीभ्रूणहत्येमुळे घटत असलेलं मुलींचे जन्मदर आणि त्यामुळे वाढत असलेली विवाह इच्छुक तरुणांची संख्या हा एक चिंतेचा विषय बनला आहे. विवाह जमवून देण्याच्या बहाण्याने राज्यभरामध्ये एजंटगिरीचे जाळे पसरले आहे. त्यामुळे अनाथ मुलींची किंवा वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींशी लग्न लावून ही टोळी तरुणांची फसवणूक करत आहेत. अशाच प्रकारची ही टोळी येवला तालुका पोलिसांनी जेरबंद केली आहे.
nashik district yeola police arrest cheating youth
marriage offer