येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील मुखेड येथे प्रतीक सुदाम आहेर या तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १९ ऑगस्ट शनिवार रोजी हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की प्रतीक याचे गावातीलच एका तरुणी बरोबर प्रेम होते. याचा राग तिच्या कुटुंबियांना होता. यातूनच प्रतीकला निर्जन स्थळी बोलवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान येवला तालुका पोलिसांनी वसंत केशव जाधव, संदीप वसंत जाधव, सुनील वसंत जाधव आणि निखिल संदीप जाधव या संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले आहे.
ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, येवला तालुका प्रभारी पोलीस निरीक्षक तथा प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बहीर,शिंदे यांच्यासह पोलिस हवालदार माधव सानप पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ यांनी धाव घेतली. आरोपींविरोधात जबरी मारहाण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.
Nashik District Yeola Crime Youth Murder
Love Affair Rural Police Arrested FIR Case Booked