त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त हजारो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी बमबम भोलेच्या जयघोषाने अवघी त्र्यंबक नगरी दुमदुमुन गेली. श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा प्रशासनाची कसोटी पाहाणारा असतो. वास्तविक पहाता वर्षभरात केव्हाही प्रदक्षिणा केली तरी चालते त्याचप्रमाणे भगवान शिवशंकराला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात सुध्दा कधीही प्रदक्षिणा केली तरी त्याचे फळ सारखेच मिळते. तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा केल्याने पूण्य अधिक मिळते असा समज पसरल्याने गेल्या काही वर्षांपासून या दिवशी भाविक प्रचंड गर्दी करतात की त्याचे नियोजन जिल्हा पातळीवरून करावे लागते. याचाच एक भाग म्हणुन शनिवारी रात्री पासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
पोलीस अधिक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपअधिक्षक कविता फडतरे, पोलीस निरिक्षक बिपीन शेवाळे, यांचेसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रविवारी सकाळ पासून खासगी वाहनांना त्र्यंबककडे प्रवेश करण्यास बंदी घातली होती. नाशिकबाजूने येणारी खासगी वाहने खंबाळे येथे, जव्हार बाजुने येणारी वाहने अंबोली येथे तर घोटी बाजूने येणारी वाहने पहिणे येथे अडविण्यात आली होती. तेथून सर्व प्रवाशांना महामंडळाच्या बसने त्र्यंबकमध्ये सोडण्यात येत होते.
रविवारी सायंकाळ पासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता. संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपार पर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रात्री प्रदक्षिणेच्या भक्तीभावापेक्षा धुडगुसच जास्त होता. जोरजोरात ओरडणे, भोंगे, शिट्टया वाजवणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे धार्मिक महत्व असलेल्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला विकृत स्वरुप येत होते. रविवार सायंकाळ पासून ते सोमवारी दुपार पर्यंत भाविक प्रदाक्षिणेला जातच होते. जवळपास एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती. प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकेश्र्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. नेमुन दिलेल्या वेळेत स्थानिक नागरीकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. धर्मदर्शन रांग तसेच देणगी दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. तिसरा श्रावणी सोमवार पर्वकाल निमित्त दरवर्षी प्रमाणे पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर मार्फत विश्वकल्याणार्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव व सर्व विश्वस्थ यांचे हस्ते लघुरुद्र संपन्न करण्यात आला.
त्र्यंबकराजाचा पालखी सोहळा
दुपारी ३ वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला. दुपारी ठिक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा अभिषेक करण्यात आला. वंशपरंपरागत पुजारी वेदमुर्ती नारायण फडके यांनी पुजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणुन अजिंक्य जोशी, यज्ञेश कावनईकर, संजय दिघे, कुणाल लोहगावकर, गंधर्व वाडेकर यांनी सेवा बजावली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली.
भगवान त्र्यंबकराजाचा सुवर्ण मुखवटा काही क्षण सभामंडपातील कासवावर ठेवण्यात आला. यावेळी भाविकांनी बम बम भोलेचा जयघोष केला. यानंतर मुखवटा परत देवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आला. याठिकाणी भगवान त्र्यंबकेश्वराचा सुवर्ण मुखवटा व रत्नजडीत मुकुटाचे दर्शन भाविकांना घडविण्यात आले. यादरम्यान त्र्यंबकेश्वराचे प्रदोषपुष्प पुजक वेदमुर्ती डाँ. ओमकार उल्हास आराधी यांनी गर्भगृहात प्रदोषपुजा संपन्न केली. भगवान त्र्यंबकराजाच्या रजत मुखवट्यास उत्कृष्ठ शृंगार करुन आरती केली.
या सोहळ्यात मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश जिवने, विश्वस्त कैलास घुले, स्वप्निल शेलार, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, रुपाली भुतडा यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, शेकडो भाविक सामील झाले होते. दिवसभर कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी आज येथे हजेरी लावली. या सोमवारी ४ पोलीस उप अधिक्षक, १७ पोलीस निरीक्षक, २८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक, ४५० पोलीस कर्मचारी, ५०० गृहरक्षक दलाचे जवान . सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके, अजय गायकवाड व महाराष्ट्र सुरक्षा बल चे महिला कर्मचारी व सुरक्षा रक्षक एवढा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
A huge crowd of devotees visit Trimbakeshwar on the occasion of the third Shravan Monday
Nashik District Trimbakeshwar Devotees Crowd Third Shravan Somvar