नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने येत्या सोमवारपासू (२४ जानेवारी) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार आता नाशिकमध्ये शाळा सुरू होणार की नाही याबाबत मोठा खुलासा झाला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी त्यासंदर्भात माहिती दिली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने राज्य सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जेमतेम एक महिनाच शाळा सुरू राहिल्या. राज्याच्या काही भागात आणि खासकरुन महानगरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत. अशा परिस्थितीत सरसकट शाळा बंदी योग्य नसल्याचा सूर उमटला. त्यामुळेच शाळा पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. अखेर त्याची दखल राज्य सरकारने घेतली. आणि आता येत्या २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत स्थानिक पातळीवर तहसिलदार किंवा जिल्हाधिकारी हे आदेश निर्गमीत करतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याची दखल घेत नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. सद्यस्थितीत नाशिक शहर व जिल्ह्यात एकूण १४ हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, रुग्ण प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे येत्या २४ जानेवारीपासून नाशिक शहरातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले आहे. तर, सोमवारपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत. त्यामुळे आता शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.