निलेश गौतम, सटाणा
तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार घडला आहे. प्रसुतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करता मद्यधुंद वैद्यकीय अधिकाऱ्याने इतरत्र रुग्णालयात जाण्याचे सांगितले. याप्रकरणी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
शासन एकीकडे गरोदर महिला, प्रसुती, आणि कुपोषणावर कोट्यवधींचा खर्च करत असतांना ग्रामीण भागात मात्र आरोग्य यंत्रणेचे शिलेदारच या मोहिमेला हरताळ फासतांना दिसत आहेत. बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आणि या मद्यधुंद वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ विरेंद्र आवारे असे आहे. मंगळवारी (२२ ऑगस्ट) रात्री ११ वाजेच्या सुमारास कल्पना भोये (रा. खडकी, ता. कळवण) ही महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात आली. मात्र, या महिलेला रुग्णालयात दाखल न करून घेता सरळ डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉ. आवारे याने दिला. या वेळी या महिलेचे वडील काकजी बागुल रा. कपालेश्वर व नातेवाईकांनी डॉ आवारे यांना विंनती केली. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या वैद्यकीय अधिकाऱ्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या बीडच्या एका मित्राने या कुटुंबियांना अक्षरशः हुसकावून लावले.
या कुटुंबाने तात्काळ डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालय गाठत संबंधित महिलेची प्रसुती केली. दुसऱ्या दिवशी संबंधित कुटूंबियाने गावातील प्रमुख लोकांसह परिसरातील लोकप्रतिनिधींना घेत थेट कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. यावेळी रुग्णालयात हजर असलेले डॉ आवारी हा पुन्हा मद्याच्या नशेत आढळून आला. आदर्श गाव किकवारीचे प्रणेते केदा काकुळते व स्थानिक आदिवासी जनतेने या नशेबाज वैद्यकीय अधिकारीला रुग्णालयातून अक्षरशः हुसकावून लावले. गेली अनेक वर्षे या रुग्णालयात असलेला डॉ आवारी हा कायमच मद्याच्या नशेत राहत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी करूनही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाते, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आबे. येथील दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेशवर धनगे-पाटील हे येथे कायम राहत नसल्याने रुग्णसेवेचा तूर्त फज्जा उडाला आहे. आज संताप अनावर झालेल्या कपालेश्वर ग्रामस्थांनी थेट जिल्हा वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना फोनवर माहिती देली. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची आणि या रुग्णालयात पूर्णवेळ नवीन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी केली आहे.
पश्चिम भागातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र हे या भागातील पंधरा ते वीस गावांसाठी महत्त्वाचे रुग्णालय आहे. या ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळत नाही. अनेक वेळा संबंधितांना कळवूनही आरोग्य सेवा सुधारत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे .संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कपालेश्वरचे सरपंच मनोहर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा ठाकरे, सुरेश महाले, पोपट पवार, साहेबराव अहिरे, केशरबाई बागुल, उत्तम बागुल, तुषार बागुल, माधव ठाकरे, लहानू पवार, रूपाली बागुल आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.
संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची सततची तक्रार लक्ष्यात घेता त्यांच्या वर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार आहे. रुग्णालयात रुग्णाची यापुढे हेळसांड होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.
डॉ हर्षल महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी
कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या आदिवासी भागासाठी शोभेची वास्तू ठरत आहे. आरोग्य सेवा मिळत नसल्याने जनतेत नाराजी आहे. येथील वैद्यकीय अधिकारी आपल्या मर्जीने येतात आणि जातात. वरिष्ठांनी लक्ष न दिल्यास आरोग्य विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
श्री मनोहर ठाकरे, सरपंच, कपालेश्वर ग्रामपंचायत
Nashik District Satana PHC Rural Government Hospital Pregnant Women
Doctor Refuse Delivery Kapaleshwar