नाशिक – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था दूर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी तब्बल ९६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तशी माहिती खासदार डॉ. भारती पवार यानी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागातील रस्ते चकाचक होणार आहे.
डॉ. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत दिंडोरी लोकसभा मतदार संघातील रस्ते कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कानळद ते देवगाव (प्रजिमा-261) पर्यंत सुधारणा किमी 0/00 ते 14/200 भरवसफाटा रस्ता (प्रजिमा-255) ता.-निफाड,जि.नाशिक ह्या रस्त्यासाठी रु.982.97 लाखांचा निधी व जानोरी- मोहाडी- कोऱ्हाटे- दिंडोरीरोड (प्रजिमा-50) रस्त्याची सुधारणा किमी 0/00 ते 13/200 ता.-दिंडोरी, जि.-नाशिक ह्या रस्त्यासाठी रु.1337.08 लाखांचा निधी मंजूर केला. याबाबत खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मतदार संघातील जनतेच्यावतीने आभार व्यक्त केले आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी पेठ तालुक्याकरिता रु.३८१.१६ लाख, येवला तालुक्याकरिता रु.१४७.४४ लाख, निफाड तालुक्याकरिता रु.६४२.३ लाख, सुरगाणा तालुक्याकरिता रु.१८३.३१ लाख, कळवण तालुक्याकरिता रु.१७२.०२ लाख, नांदगाव तालुक्याकरिता रु.४९१.४९ लाख, चांदवड तालुक्याकरिता रु.४९५.७० लाख, सिन्नर तालुक्याकरिता रु.३९३.२० लाख, नाशिक तालुक्याकरिता रु.१३६६.८९ लाख, मालेगाव तालुक्याकरिता रु.४९५.५० लाख, सटाणा तालुक्याकरिता रु.२५४१.२४ लाख असा एकूण रु.९,६३०.३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ह्या एकूण रु.९,६३०.३ लाख निधी मंजुर केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यासाठी कुठलाही राजकीय दुजाभाव न करता भरघोस निधी मंजूर केल्या बद्दल मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खा.डॉ.भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील जनतेच्यावतीने विशेष आभार व्यक्त केले.