नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या योजनेतून जिल्ह्यातील मनमाड रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये ४४.८० कोटी, नगरसुल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये २०.०३ कोटी, लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये १०.१० कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये १०.१४ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होऊन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड, चाळीसगाव, शेगाव, बडनेरा, मलकापूर, नेपानगर या सहा रेल्वे स्थानकांचे रविवारी ६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, रेल्वे राज्यमंत्री दर्शना ज़रदोष यांची उपस्थित राहणार आहे. तसेच मनमाड रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे देखील उपस्थित राहणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विविध अद्ययावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे. विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर ब्रीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.
जिल्ह्यातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होण्यासाठी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याने डॉ. पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्रालयाचे आभार व्यक्त केले आहे.
देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांचा २४ हजार ४७० कोटी खर्चाने होणार पुनर्विकास
एका ऐतिहासिक उपक्रमांतर्गत ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधानांनी नेहमीच अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या तरतुदीवर भर दिला आहे. सार्वजनिक वाहतुकीचे माध्यम म्हणून देशभरातील नागरिकांची रेल्वेला पसंती असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी रेल्वे स्थानकांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. देशभरातील १३०९ स्थानकांच्या पुनर्विकासाकरता अमृत भारत स्थानक योजना ही पंतप्रधानांच्या या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना सुरू करण्यात आली.
या योजनेचा भाग म्हणून पंतप्रधान ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. २४ हजार ४७० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. शहराच्या दोन्ही बाजूंपासून योग्य अंतरावरील ‘सिटी सेंटर्स’ म्हणून या स्थानकांचा विकास करण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. शहराच्या एकंदर नागरी विकासाच्या समग्र दृष्टीकोनाच्या आधारे या रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत एकात्मिकतेवर भर दिला जात आहे.
२७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या ५०८ रेल्वे स्थानकांचा विस्तार आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी ५५, बिहारमधील ४९, महाराष्ट्रातील ४४, पश्चिम बंगालमधील ३७, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओदिशातील २५, पंजाबमधील २२, गुजरात आणि तेलंगणामधील प्रत्येकी २१, झारखंडमधील २०, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील प्रत्येकी १८, हरयाणातील १५ आणि कर्नाटकमधील १३ रेल्वे स्थानकांचा आणि इतरांचा समावेश आहे. या पुनर्विकासामुळे सुयोग्य रचनाकृत वाहतूक वितरण, इंटर मोडल इंटेग्रेशन आणि प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी उत्तम पद्धतीने रचना केलेल्या खुणा आणि चिन्हे अशा सुविधा सुनिश्चित करण्यासह आधुनिक प्रवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे स्थानकांच्या रचनांमध्ये स्थानिक संस्कृती, वारसा आणि वास्तुरचना यांच्या वापरावर भर दिला जाईल.
Nashik District Railway station development PM Narendra Modi
13 August Infrastucture