नाशिक – नाशिक जिल्हा नियोजन समितीची येत्या मंगळवारी (१६ नोव्हेंबर) होणार बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुनच नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद आहेत. कांदे यांनी भुजबळ यांच्यावर विविध आरोप करुन थेट मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. तसेच, हा वाद राज्यपातळीवर गाजतो आहे. अशा पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने कांदे आणि भुजबळ यांच्यात खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणार असल्याची माहिती, जिल्हा नियोजन समितीचे नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, तसेच जिल्ह्यातील खसदार व आमदार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, तसेच संबंधित सर्व कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य या बैठकीस उपस्थित राहणार आहे.
यावेळी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना, अनुसूचित जाती उपाययोजनां बाबत सन 2020-2021 अंतर्गत मार्च 2021 अखेर झालेल्या खर्चास मान्यता देणे व 2021-2022 अंतर्गत ऑक्टोबर 2021 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच 30 जानेवारी 2021 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त वाचुन कायम करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून, ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
वरील विषयासंबंधित असणाऱ्या सर्व कार्यान्वयन यंत्रणांच्या प्रमुखांनी स्वत: सविस्तर माहितीसह प्रत्यक्ष बैठक सुरू होण्यापुर्वी 15 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे, असेही जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.