नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तब्बल ३ दिवसांनंतर आज सकाळी कांदा लिलाव सुरू झाले. पण, थोड्याच वेळात हे लिलाव बंद पाडण्यात आले. कांद्याच्या निर्यातीवर तब्बल ४० टक्के शुल्क लावण्यात आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच लासलगाव, चांदवड, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद पाडण्यात आले आहेत.
चांदवड बाजार समितीत सकाळीच कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून थेट मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. तब्बल दोन तासांपासून शेतकऱ्यांना चक्का जाम केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी कांदाप्रश्नी व्यापारी आणि शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आजपासून कांदा लिलाव सुरू झाले. पण, आज पुन्हा शेतकरी संतप्त झाले व थेट रस्त्यावर उतरले. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी केलेली मध्यस्थी फेल ठरली.
चांदवडला कांद्याच्या १५० गाड्या लिलावासाठी बाजार समितीत दाखल झाल्या. पण, शेतकऱ्यांनी या लिलावाला विरोध केला. नाफेडचे अधिकारी हजर नसल्याने शेतकरी संतापले होते. नाफेड मार्फत होणारी खरेदी थेट बाजारात करण्याची मागणी लावून धरत शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा ठप्प झाला. त्यानंतर मुंबई – आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास रास्ता रोको करण्यात आल्यावर आंदोलनकर्त्यांशी फोनवर अधिकारी बोलले. त्यानंतर सोमवार पर्यंत नाफेडने खरेदी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन कारणा-याचा इशारा देत आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र त्याचवेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी आंदोलनातून बाजूला होत पुन्हा कार्यकर्त्यांसह रास्ता रोकोला सुरवात केली. त्यांनी रस्त्यावर झोपत आंदोलन सुरू केले. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन कर्त्याना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.
शेतकऱ्यांनी चांदवड पाठोपाठ, पिंपळगाव व लासलगावमध्येही कांदा लिलाव बंद पाडला. या आंदोलनात शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून जोरदार घोषणाबाजी केली. नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते. लिलावात १७०० ते १८०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याचे लिलाव बंद पाडत, नाफेडने प्रत्यक्षात लिलाव करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
Nashik District Onion Auction Stop Farmer Agitation
Chandwad Rasta Roko Mumbai Agra Highway Pimpalgaon Lasalgaon Agriculture Protest