योगेश सगर, निफाड
मानवी वस्तीकडे येणाऱ्या बिबट्यांनी आता थेट आक्रमक हल्ले सुरू केल्याची बाब निदर्शनास येत आहे. यापूर्वी सिन्नर तालुक्यात दोन तर नाशिक शहरात एक घटना घडली आहे. आता निफाड तालुक्यातील एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एकाचवेळी दोन बिबट्यांनी दुचाकीस्वारावर थेट हल्ला केला. त्यात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चांदोरी शिवारातील नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्यमार्गावर ही घटना घडली आहे. हॉटेल महाराजा नजिक दोन बिबट्यांनी दुचाकीस्वारावर हल्ला चढवला. त्यात दोन लहान मुलींसह तरुण जखमी झाला आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी, नागापूर, शिंपी- टाकळी या शिवारात बिबट्याचा संचार आहे. छत्रपती संभाजी नगर ते नाशिक राज्य मार्गावरही बिबट्यांची दहशत आहे. हर्षल बाळासाहेब चिखले ( वय 29) हे जान्हवी रानडे (15) अनन्या रानडे (12) या दोन्ही भाचींना दुचाकीवरून घेऊन जात होते. नाशिककडून ते चांदोरी सुकेणेकडे जात असतानाच जात असताना चांदोरी शिवारामध्ये वीज उपकेंद्रानजिक असलेल्या महाराजा हॉटेल येथे ते आले. यावेळी राज्यमार्ग ओलांडणाऱ्या दोन बिबट्यांनी त्यांच्यावर थेट झडप घातली.
अचानक दोन बिबट्यांनी हल्ला केल्याने दुचाकीवरून तिघे जण जमिनीवर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला हाता पायाला गंभीर जखमा झाल्या. दरम्यान जखमींना तात्काळ चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथम उपचार करण्यात आले. वनविभागाला याबाबत आज दि.14 रोजी खबर मिळाली. वन परिशेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे यांनी तत्काळ माहिती घेत त्यांच्या पथकाचे वनपाल मनमाड भगवान जाधव, वनरक्षक राजेंद्र दौंड यांनी आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दोन वाजता निफाडच्या वनविभागाने घटना स्थळाला व मौजे सुकेणे येथील चिखले यांच्या वस्तीला भेट दिली. तसेच, पंचनामा केला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांची प्रकृती स्थिर असून गंभीर जखमा झाले आहेत. या घटनेमुळे सुकेणे चांदोरी नागापूर या शिवारात मोठी खळबळ उडाली असून बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
Nashik District Niphad two Leopards Attack on Bike
3 Injured Rural Aurangabad Road