निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात अनेक तरुण-तरुणींचे शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न असते. परंतु सर्वांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही, मात्र कष्ट, जिद्द आणि चिकाटी यामुळे यश मिळू शकते. हे देखील तितकेच खरे, निफाड तालुक्यातील एका महिलेने सर्व जबाबदारी सांभाळून असेच उज्ज्वल यश संपादन केले आहे. तिच्या या यशाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या निफाडच्या वंदना गायकवाड या अधिकारी झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकरी कन्या
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असो की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी यासाठी दरवर्षी अनेक तरुण-तरुणी आपले नशीब आजमावत असतात. परंतु सर्वांनाच यश मिळते असे नाही. सध्याच्या काळात तर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी काही जण तर मोठे मोठे क्लासेस लावतात. मात्र यात काही विद्यार्थी हे कोणताही क्लास न लावता अधिकारी झाले. या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातून वंदना शिंदे गायकवाड यांनी एमपीएससीत चांगले यश मिळवले आहे. वंदना या ओझर मिग येथील शेतकरी अशोक शिंदे यांच्या कन्या असून तालुक्यातील शिरवाडे येथील त्यांचे गायकवाड कुटुंबात त्यांचे सासर आहे.
सासरची जबाबदारी सांभाळून
लग्नानंतर सासरची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी अत्यंत जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळविले आहे. कारण काही वेळा मुलींना लग्नानंतर शिक्षण करणे अवघड होत असते, असे म्हटले जाते. परंतु आवड आणि इच्छा शक्ती असेल तर सर्व काही शक्य होते. कोणतेही समस्या अडचण आली तरी आपल्याला यश मिळते. वंदना शिंदे गायकवाड यांनी देखील अशाच प्रकारे यशाला गवसणी घातली आहे. वंदना यांनी संसाराचा गाडा यशस्वीपणे सांभाळत, नोकरी करत एमपीएससीची परीक्षा दिली आणि त्या पात्र ठरल्या आहेत.
ओझरच्या शाळेत शिक्षण
वंदना यांचे प्राथमिक शिक्षण ओझर येथील अभिनव बाल विकास मंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण माधवराव बोरस्ते विद्यालयात झाले. नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये पदविका तर अमरावती येथिल शासकीय महाविद्यालयात मध्ये पदवी प्राप्त केली. वंदनाला सुरुवातीपासून अभ्यासाची आवड होती. त्यानुसार त्यांनी घरचा संसार सांभाळत एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.लग्नानंतर ही तिने परीक्षेची तयारी सोडली नाही. या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात वंदना यांना पती अमोल यांची देखील मोलाची साथ मिळाली. म्हणजेच पत्नीच्या यशामागे पतीचा मोठा वाटा आहे, अमोल हे देखील उच्चशिक्षित असून केएसबी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.
आता राजपत्रित अधिकारी
या वर्षी एमएपीएससी परिक्षेत सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, राजपत्रित -वर्ग 2, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र शासन पदी वंदना यांनी उत्तीर्ण होत माहेर अन सासरचे नाव उज्वल केले आहे. नोकरी व घर कामातून वेळ काढून वंदना यांनी परीक्षेत यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वजण कौतुक करत आहेत. माहेर शिंदे अन सासर गायकवाड परिवारात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. इतकेच नव्हे तर तालुक्यातील महिलांपुढे देखील त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. वंदना यांनी या पूर्वीदेखील त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र त्यात तिला यश मिळाले नाही, मात्र त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते.
Nashik District Niphad Married Women MPSC Success Story