नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार निधीतील १६० कामांना प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा नियोजन मंडळाने २३ कोटी १८ लाख ५३ हजार रुपये संबंधित विभागांना वितरित केला आहे. यापुढे निधी खर्च करण्याच्यादृष्टीने आवश्यक ते सोपस्कार पार पडण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असली तरी . जिल्हा परिषदेत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा मनमानी कारभार पाहता, निधी खर्चाची जबाबदारी वेळेत पार पाडण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर कुरघोडीचे राजकारण सुरु झाल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका शिंदे सरकारने लावला.नाशिक जिल्ह्यात जवळपास ५५० ते ६०० कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. कालांतराने स्थगिती उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी यासंदर्भात काढलेल्या आदेशाविषयीच संदिग्धता होती. त्यामुळे स्थगिती नेमकी कोणत्या कामांवरील अन कोणत्या तालुक्यातील उठली हा प्रश्न कायम होता. विकास कामांची सारीच भिस्त आमदार निधीवर होती. आता या आमदार निधीहीतून कामे करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उदासीनताच दाखवली.
जिल्हा नियोजन मंडळाने आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून १५ कोटी २० लाख आठ हजार रुपये अंदाजपत्रकीय रकमेच्या १६० कामांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी अंदाजपत्रक तयार करणे तसेच कार्यारंभ आदेश देणे अशी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. निधी वेळेत खर्च करण्यासाठी तत्परता दाखविणेही गरजेचे आहे. पण संबंधित यंत्रणांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचे दिसून आले.जिल्हा परिषदेच्या बाबतीत ही उदासीनता लपून राहू शकली नाही. बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्या मनमानी कारभाराविषयी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार सुहास कांदे यांनी तक्रार केली. जवळपास पंधरा दिवसांपासून ते रजेवर आहेत. त्यांचा अतिरिक्त कारभार ज्यांच्याकडे आहे ते बांधकाम दोन चे कार्यकारी अभियंता नारखेडे यांनाही कामाचा बोजा झेपत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियोजन मंडळाने प्रशासकीय मान्यता देऊन निधी दिला असला तरी जिल्हा परिषदेत कामांची सद्यस्थिती नेमकी काय हे कळायला मार्ग नाही आर्थिक वर्ष संपण्यास चार महिने बाकी आहेत. तरीही निधी वेळेत खर्च करण्याच्यादृष्टीने फारशी हालचाल दिसून येत नाही.
यांचे एकही नवीन काम नाही
आमदार नितीन पवार, आमदार मोहमद इस्माईल अब्दुल खालिक, आमदार किशोर दराडे यांच्या मतदार संघात एकही नवीन काम नाही. पण मागील कामांच्या दायित्वापोटी पवार यांच्या मतदारसंघात एक कोटी १४ लाख ६२ हजार रुपये, मोहमद इस्माईल अब्दुल खालिक यांच्या मतदारसंघात एक कोटी ५४ लाख 56 हजार रुपये तर दराडे यांच्या मतदारसंघात ४१ लाख ९४ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. सगळ्याच आमदारांच्या मतदारसंघात १५ कोटी २० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात असली तरी प्रत्यक्षात मात्र २३ कोटी १८ लाख ५३ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. यात दायित्वही समाविष्ठ आहे.
आमदारनिहाय मंजूर कामे आणि निधी असा
*आमदार दिलीप बोरसे – ३१ कामे (४ कोटी ३७ लाख रुपये)
*नरहरी झिरवाळ -०९ कामे (८९ लाख ८५ हजार रुपये)
*हिरामण खोसकर _२५ कामे (२ कोटी २८ लाख रुपये)
*सुहास कांदे -१० कामे ( १ कोटी सहा लाख रुपये)
*दादा भुसे – ३ कामे (६ लाख २४ हजार)
*राहुल आहेर – ९ कामे (८९ लाख ८८ हजार रुपये)
*छगन भुजबळ -१ काम (१२ लाख रुपये)
*दिलीप बनकर-१ काम (५ लाख रुपये)
*माणिक कोकाटे -२ कामे (९ लाख ९८ हजार रुपये)
*राहुल ढिकले – १७ कामे (८५ लाख ५२ हजार रुपये)
*देवयानी फरांदे -७ कामे (१ कोटी १० लाख रुपये)
*सीमा हिरे – १ काम (५० हजार रुपये)
*सरोज अहिरे -८ कामे (६२ लाख 13 हजार रुपये)
*नरेंद्र दराडे -३६ कामे (२ कोटी ७६ लाख ६५ हजार रुपये)
Nashik District MLA Fund Expenses Details