नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात गोवरचे संशयित आढळून आले असले तरी परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या आजारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहने हाकणे जिकिरीचे झाले आहे. राज्य महामार्गावरील खड्डे येत्या १५ डिसेम्बरपर्यंत बुजवून रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. ब्लॅक स्पॉट संदर्भातही त्यांनी आश्वासन दिले. महालापालिका आयुक्तांशी येत्या दोन -तीन दिवसात चर्चा करून उपाययोजना करण्यात येतील, असे ते म्हणाले. महावितरणच्या धडक कारवाईमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. थकीत वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यावर भुसे यांनी वीज पुरवठा खंडित न करण्याच्या सूचना महावितरणला दिल्या. तसेच नादुरुस्त ट्रान्स्फार्मर दुरुस्ती विलंब न लावता आठ दिवसात बदलून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होण्यास मध्यतंरी अडथळा निर्माण झाला होता. ही अडचण आता दूर झाली असून लवकरच रक्कम जमा करण्याचे काम सुरळीत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Nashik District Measles Disease Guardian Minister Decision