मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातही पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे या नदीवरील अनेक लहान-मोठे पूल पाण्यात गेले आहेत. हा पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या ७ दरवाजांमधून ३३ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. गिरणा नदीवरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. चणकापूर धारणाखालील अठंबे पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे कळवण, वणीकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. तसे, पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. नदीपात्रा लगतच्या नागरिकांना सातर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतपिकांना जीवदान
गेल्या तीन महिन्यांपासून पावसाची जोरदार प्रतीक्षा होती. पेरणी झालेल्या पिके वाया जाण्याची भीती होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पाऊस सांगितला असल्याने परिसरातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आहेत.
Release of water from Chankapur Dam; Small bridge over Girna river under water
Nashik District Malegaon Rain Chankapur Dam Water Discharge River Flood