नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याचा प्रकार नवा राहिलेला नाही. गेल्या काही दिवसात नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. सिन्नर तालुक्यात बिबट्याने एका शेतकऱ्यावर आणि एका शाळकरीवर हल्ला केल्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बिबट्यांची दहशत कायम आहे. आता कळवण तालुक्यात एक बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याची वेगळी घटना घडली आहे.
कळवण तालुक्यातील नवी बेज शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात हा प्रकार घडला आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने कोंबड्यांचे खुराडे पाहिले. आपल्याला आता भक्ष्य मिळेल या खात्रीने या बिबट्याने थेट खुराड्याला लक्ष्य केले. या सर्व प्रकारात हा बिबट्याच मात्र कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला.
कोंबड्यांची शिकार करायला गेलेला दीड वर्षाचा बिबट्या खुराड्यात अडकल्याची घटना या शेतकऱ्याला सकाळच्या सुमारास दिसून आली. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे शेतकऱ्याचे लक्ष खुराड्याकडे वेधले गेले. त्यामुळे तो भयभीत झाला. त्याने तातडीने पोलिस आणि वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक साधनसामग्रीसह घटनास्थळी पोहचले. त्यानंतर या बिबट्याला पकडण्याचे कार्य हाती घेण्यात आली. पथकाने सर्वप्रथम या बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर हा बिबट्या बेशुद्ध झाला. त्याद्वारे बिबट्याला खुराड्यातून मोठ्या पिंजऱ्यात स्थलांतरीत करण्यात आले. आता या बिबट्याला वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले आहे. आरोग्य तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. तसे वनविभागाने सांगितले आहे.
गेल्या काही दिवसात मानवी वस्तीकडे बिबटे येण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हयात बिबट्याच्या हल्याच्या घटनाही वाढल्या आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकीवरुन जाणाऱ्या शेतकऱ्यावर थेट बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर बिबट्याने शाळकरी मुलीवर अचानक झडप घातल्याची बाब समोर आली आहे. पण, कळवणच्या घटनेत दीड वर्षाचा बिबट्या खुराड्यात अडकला.
Nashik District Kalwan Leopard Trap Hen Cage
Forest Wild Animal Navi Bej Taluka Rural