नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (आयएएस) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक श्रीमती आशिमा मित्तल, (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण श्री. विशाल नरवाडे (आयएएस) यांच्या नियोजनाने देशभरातील 13 सनदी अधिकाऱ्यांचा आदिवासी वन गावांचा अभ्यास दौरा नुकताच यशस्वीपणे पार पडला.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सर्वात कठीण परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही परीक्षा सर्व सामान्य नागरिकांमध्ये आयएएस परीक्षा म्हणून परिचित आहे. या परीक्षेसाठी दरवर्षी सरासरी 9 ते 10 लाख उमेदवार अर्ज करतात. आणि इतर अनेकांना या परीक्षेच्या खडतरपणाच्या भीतीमुळे अर्ज भरण्याचे धाडसही होत नाही. या लाखो उमेदवारांपैकी दरवर्षी फक्त 200-300 उमेदवार आयएएस आणि आयपीएस होतात.
निवड झाल्यानंतर त्यांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमी, मसुरी, उत्तराखंड येथे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांना गावपातळीवरील जीवनशैली, गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी जाणून घेण्यासाठी एक आठवडाभर गावभेट कार्यक्रम करावा लागतो.
यावर्षी देखील 2023 च्या परीक्षेतून निवडलेले अधिकारी गावभेटी कार्यक्रमावर आहेत. याआधी उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि नजीकच्या राज्यांमध्ये मसुरीजवळील गावांमध्ये सामान्यतः गावभेट कार्यक्रम आयोजित केला जात होता. परंतु यावर्षी त्यांनी गावभेट कार्यक्रमाच्या अभ्यासासाठी “आदिवासी वन गाव” ही थीम स्वीकारली आहे. आणि अशाप्रकारे संपूर्ण भारतामध्ये अधिकारी प्रशिक्षणार्थींना 8 दिवसांच्या 98 व्या फाउंडेशन कोर्ससाठी फील्ड स्टडी आणि रिसर्च प्रोग्रामसाठी पाठविण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारत देशात फक्त मोजकीच/ठराविक ठिकाणेच निवडण्यात आली आहेत. आणि त्यापैकी एक म्हणजे नाशिक जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण प्रकल्प कार्यालयातील आदिवासी गावांचा अभ्यास.
कळवण प्रकल्प कार्यालयाची भारत देशातून निवड
भारत देशातील प्रशासनाचे भविष्य असणारे आयएएस आणि आयपीएस यांच्या अतिमहत्वपूर्ण अभ्यास दौऱ्यासाठी कळवण प्रकल्प कार्यालयाची निवड करण्याचे श्रेय प्रकल्प अधिकारी IAS श्री विशाल नरवाडे आणि त्यांच्या कार्यालयीन टीमच्या प्रभावी कामकाजाला जाते.
ग्राम अभ्यास कार्यक्रमाची रुपरेषा:-
“प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण, श्री विशाल नरवाडे, (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व 13 अधिकारी प्रशिक्षणार्थी प्रत्येकी 6/7 च्या दोन गटात विभागले गेले होते.
एक गट नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील चणकापूर या गावी तर दुसरा गट नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील दहिंदुले या गावी अभ्यासासाठी होते.
श्री. विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आदिवासी ग्रामीण लोकांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेतली. तसेच आदिवासी विकासाशी संबंधित सर्व शासकीय योजनांबद्दल जाणून घेतले आणि त्यांचे मूल्यांकन केले. सर्व ग्रामस्थांशी सतत संवाद हा “ग्राम क्षेत्र अभ्यास आणि संशोधन कार्यक्रम” चा महत्त्वाचा घटक असतो. शेवटी या सर्व अधिकाऱ्यांनी त्या गावांच्या विकासात आणखी सुधारणा करण्यासाठी काही सूचना गावांना सादर केल्या.
हे १३ अधिकारी झाले सहभागी
सुश्री. दिक्षा भोरिया, (भारतीय पोलीस सेवा), मथुरा, उत्तर प्रदेश येथुन
सुश्री. स्वाती शर्मा, (आयएएस) जबलपूर, (मध्य प्रदेश) येथुन
श्री. राज बहादूर सिंग मीना (आयएफएस) करौली, राजस्थान येथून
श्री. जय करण यादव, (भारतीय महसूल सेवा/आयआरएस), गाझीपूर, (उत्तर प्रदेश) येथून
सुश्री सुवांगी खुंटिया, (आयएएस), ओडिशा, येथील
सुश्री. अंजली शर्मा, (आयएएस) बिहार, मधून
सुश्री. आरंशा यादव, (आयपीएस), गुडगाव (हरियाणा) येथून
श्री. विभाकर पाल, (भारतीय महसूल सेवा/आयआरएस) मसुरी, उत्तराखंड, येथील
श्री. मनोज सिंग, (भारतीय व्यापार सेवा/आयटीएस) गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून
श्री. तन्मय खन्ना, ( आयएएस), दिल्ली येथून
श्री. सिद्धार्थ शुक्ला, (आयएएस) आझमगड, उत्तर प्रदेश येथून
श्री. गौरव कुमार त्रिपाठी, (आयपीएस/ भारतीय पोलीस सेवा), गोरखपुर (शहर) (उत्तर प्रदेश) येथून
श्री. गौरव यादव, (आयपीएस/भारतीय पोलीस सेवा) झाशी (उत्तर प्रदेश) येथून
हा क्षेत्रीय अभ्यास आणि संशोधन कार्यक्रम 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर, 2023 या कालावधीत 8 दिवस पार पडला. सर्व 13 अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि श्री. विशाल नरवाडे त्यांच्या टीमसह 8 दिवस गावातच मुक्कामी राहिले. नाशिक जिल्ह्यातील कळवण तहसीलमधील चणकापूर गाव आणि बागलाण/सटाणा तालुक्याचे दहिंदुले गावातील ग्रामस्थांनी अतिशय उत्सुकतेने त्यांच्या राष्ट्रीय पाहुण्यांचे स्वागत केले. प्रकल्प अधिकारी श्री विशाल नरवाडे यांच्या टीमसोबत 100% प्रयत्न आणि सहकार्याने संपूर्ण आठवडा सर्व ग्रामस्थांनी आनंदाने आपली ही राष्ट्रीय जबाबदारी पार पाडली.
अभ्यास दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सर्व 13 अधिकार्यांनी नाशिक जिल्हाधिकारी श्री शर्मा यांना त्यांचा “फीडबॅक रिपोर्ट” सादर केला. या अभ्यास दौऱ्यामुळे अधिकारी प्रशिक्षणार्थी तसेच स्थानिक प्रशासनाला निश्चितच मदत होईल. असे सहाय्यक जिल्हाधिकारी, तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण श्री. विशाल नरवाडे (आय. ए. एस.) यांनी कळविले आहे.
Nashik District Kalwan Government Office IAS Officer Study Centre