दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथे तीन वर्षांपुर्वी झालेल्या खुनाचा आरोपी जामीनावर सुटताच खुन झालेल्या युवकाच्या वडील व इतरांनी त्या आरोपीची हत्या करत खुनाचा बदला खुनाने घेतल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथे २०२० मध्ये शिवाजी सुखदेव पारधी या युवकाचा सागर भगवान लिलके व त्याच्या भावानी व इतर आरोपींनी खुन केला होता. त्या गुन्ह्यात त्यांना अटक झालेली होती. त्यातून नुकतेच जामीनीवर त्यांची सुटका झाली होती. याची माहिती शिवाजी पारधी यांच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी सागर लिलके व इतरांचा बदला घेण्याचे ठरवले. यावेळी गुरुवार १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० ते ५ वाजेच्या दरम्यान सागर व त्याची पत्नी सपना लिलके हे दवाखान्यातून घरी जात असतांना त्यांना रस्त्यात गाठून समाधान प्रभाकर टोंगारे याने त्याच्या हातातील कोयता व राजेंद्र रामदास पारधी याने त्याच्या हातातील चॉपरने डोक्यात वार करुन गंभीर दुखापत केली.
यावेळी झालेल्या रक्तस्त्रावामुळे सागर लिलके याचा मृत्यू झाला. यावेळी घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, दिंडोरीचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांसह दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी समाधान टोंगारे व राजेंद्र पारधी यांच्याबरोबरच खुनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल दगु पारधी, संजय लिलके, योगेश लिलके, चंद्रकांत पारधी, शिवाजी लिलके, वाळू लिलके, साजन लिलके, मोहन लिलके, सुनील टोंगारे, लहानु टोंगारे, संभाजी पारधी, सुखदेव पारधी,अजय पारधी, मुरलीधर लिलके, सोमनाथ पारधी, निवृत्ती लिलके, प्रभाकर टोंगारे, कचरु पारधी, सुरेश लिलके असे एकुण २१ जणांवर मयत सागर लिलके याच्या पत्नी सपना लिलके यांच्या फिर्यादीन्वये दिंडोरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास ढोकरे यांच्यासह दिंडोरी पोलिस करीत आहे.
Kochargaon in Dindori taluka news Nashik District Dindori Crime Murder Rural Trible Police