निलेश गौतम, सटाणा
बागलाण तालुक्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने विमा नुकसान भरपाईच्या २५% मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम अदा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास अशा स्वरूपाची मदत देण्याची तरतूद आहे.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्याबाबत प्रस्ताव दाखल करून मागणी करण्यात आली होती.त्यास यश आले असून तालुक्यातील जवळपास ५६ हजार ९४१ विमाधारक शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.
दुष्काळ संहिता २०१६ नुसार तीव्र दुष्काळ स्थिती असल्यामुळे बागलाण तालुक्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या विमाधारक शेतकऱ्यांसाठी हा लाभ मिळणार आहे.
याबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नुकसान भरपाई निश्चित करणेबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.प्रतिकूल परिस्थितीमुळे पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या तालुक्यातील पिकनिहाय महसूल मंडळनिहाय अपेक्षित उत्पादन व मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाची माहिती सादर करण्यात आली होती.त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स पिक विमा कंपनीस अधिसूचना जारी झाल्यापासून एक महिन्याच्या आत या तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५% आगाऊ रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
पीक निहाय झालेली घट (टक्केवारीत)
मका पिकासाठी सटाणा मंडळात ६७.८३%,ब्राह्मणगाव मंडळात ९७.११%, जायखेडा मंडळात ७६.९३%,मुल्हेर मंडळात ४५.०३%,नामपुर मंडळात ७८.९६%,विरगाव मंडळात ५३.७९ %,डांगसौंदाणे मंडळात ५४.३८% तर ताहाराबाद मंडळात ५७.७९% सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट आली आहे. बाजरी पिकासाठी सटाणा मंडळात ८५.८२%,ब्राह्मणगाव मंडळात ९५.९९%, जायखेडा मंडळात ७४.३१%,मुल्हेर मंडळात ५४.१६%,नामपुर मंडळात ७१.८८%,विरगाव मंडळात ५१.०२%,डांगसौंदाणे मंडळात ५३.५२%, ताहाराबाद मंडळात ७८.४६% एवढी घट आली आहे. भात पिकासाठी डांगसौंदाणे मंडळात ५४.५८% एवढी घट आली आहे.भुईमूग पिकासाठी जायखेडा मंडळात ७३.९१%,विरगाव मंडळात ७०.२४%,नामपुर मंडळात ३७.८६%,डांगसौंदाणे मंडळात ७९.९१% एवढी घट आली आहे.
५०% पेक्षा अधिक घट आलेल्या या सर्व विमाधारक शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईच्या २५% आगाऊ रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जारी केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तातडीने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना करून नुकसान भरपाईची २५%आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत अंमलबजावणी करून दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाला दिलासा द्यावा तसेच ही रक्कम कर्ज खात्यात वळवू नयेत आशा सक्त सूचना बँकांना द्याव्यात .
– दिलीप बोरसे, आमदार, बागलाण
Nashik District Crop Insurance Farmer Compensation Collector Order