नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुटखा विरोधात ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गेल्या दोन महिन्यात तब्बल दोन कोटीहून अधिक रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याकारवाईत १६९ गुन्हे दाखल करीत पोलिसांनी १७८ तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई यापूढेही सुरूच राहणार असून गुटखा विक्रेत्यांबाबत माहिती असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा ग्रामिण पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात गुटखा,पानमसाला व सुगंधी तंबाखूवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही शहरासह जिह्यात त्याचे राजरोसपणे विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमिवर ग्रामिण पोलिसांनी गुटखा विरोधी मोहिम हाती घेतली आहे. ६ ते ३० जून या पहिल्या अभियानात पोलिसांनी १०९ केसेस दाखल करीत ११५ तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या कारवाईत १ कोटी ३६ लाख ६ हजार ७८५ रुपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला होता. पहिल्या अभियानादरम्यान जिल्हयातील गुटखा विक्री केंद्र,पुरवठादार व वाहतुकदार यांच्या साखळीवर मोठी कारवाई करण्यात आल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. पहिल्या अभियानात भरीव यश आल्याने पोलिसांनी पुन्हा ६ ते ३१ जुलै दुसरे अभियान राबविले. या अभियानात ६० केसेस दाखल करीत १७८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. संशयितांच्या ताब्यातून ७२ लाख ८६ हजार १५२ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या संशयितांपैकी ३७ तस्कर आजही जेलमध्ये असून ७ जणाना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. ग्रामिण भागातील अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी आठ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांकडून जिह्यात सर्वच अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. गुटखा पान मसाला व इतर प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थाविषयी नागरीकांनी काही माहिती असल्यास ग्रामिण पोलिसांच्या हेल्पलाईन क्र. ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधून असे आवाहन अधिक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
nashik district crime rural police gutkha action
sp shahaji umap