नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा न्यायालयातील अनेक न्यायाधीश, कर्मचारी, वकील हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यानंतरही न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे न्यायालयातील सुनावण्या ऑनलाईन होण्याची चिन्हे आहेत.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघवसे यांनी केलेल्या सूचनेवरून नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे यांनी सर्व वकीलांना एक पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्हा न्यायालयातील अनेक न्यायाधीश व स्टाफ करोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तरी सर्व वकिलांना विनंती आहे की, आपण आपल्या कोणत्याही पक्षकारांना कोर्टात बोलावू नये व गर्दी करू नये. या सूचनेची अंमलबजावणी न झाल्यास माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना जे अधिकार दिलेले आहेत त्यानुसार कोर्ट कामकाजावर मर्यादा येऊ शकतात. तसेच फिजिकल कामकाज बंद होऊ शकते. तसेच ऑनलाईन सुनावणी सुरू होऊ शकतात. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व पक्षकारांना कोर्टात हजर न राहण्याबद्दल च्या सूचना कराव्यात. अन्यथा येणाऱ्या परिस्थितीस आपणा सगळ्यांना सामोरे जावे लागेल. सगळ्यांनी परिस्थितीचे भान ठेवावे, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश व नाशिक वकील संघामार्फत करण्यात आले आहे.