नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने नाशिक जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी गंगाधरन डी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सध्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली झाली आहे. अद्याप मांढरे यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. नवे जिल्हाधिकारी हे कधी पदभार घेतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मांढरे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. नाशिक जिल्ह्याचा कोरोना लढा, विविध निवडणुका आणि अन्य कार्यक्रम हे त्यांच्या नेतृत्वात झाले. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. त्यामुळेच नाशिकच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे. गंगाधरन डी हे २०१३ चे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या मंत्रालयात मुख्य सचिवांचे उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे, कोरोना संकटात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांसाठी ‘शासकीय मदत दूत’ योजना राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा विशेष पुरस्काराने कालच सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बालविकास सचिव श्रीमती आय ए कुंदन, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रुबल अग्रवाल, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील ४० महसूल अधिकाऱ्यांनी कोरानामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ५६ विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत कण्याची जबाबदारी घेतली आहे. दोन्ही पालक गमावल्यानंतर अनाथ झालेल्या या बालकांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते. पालकांअभावी ही बालकं सध्या जवळच्या नातेवाईकांकडे राहात असून अनेकांच्या नातेवाईकांना अनाथ मुलांचा अतिरिक्त भार उचलणे कठीण झाले आहे. अशा बालकांचे शासकीय मदत दूत बनून हरप्रकारे मदत करण्याचा हा उपक्रम आहे. त्यात सहभागी प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलांच्या भेटीगाठी, त्यांना मदत, संपर्क सुरू केला आहे. पाच लाखांची शासकीय मदत, शैक्षणिक खर्चाव्यतिरिक्त अधिकाऱ्यांनी उपक्रम म्हणून त्यात सहभाग घेतला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: जुळ्या मुलींची जबाबदारी घेतली आहे.
शासकीय सेवेत असल्याचा अभिमान वाटण्याचा क्षण : सूरज मांढरे
शासकीय मदत दूत मोहीम सुरू झाली. प्रत्येक अधिकाऱ्यांनी कुटुंबांशी त्वरित संपर्क साधला. नेमकी कोणत्या मदतीला आवश्यकता आहे याची माहिती घेत गर्जा त्वरित पूर्ण केल्या. आम्ही कुटुंब सक्षम करण्यासाठी ४० हून अधिक योजनांची पुस्तिका तयार केली. अनेक स्वयंसेवक संस्थांनी आणि व्यक्तिंनी यातून प्रेरणा घेवून मोफत शिक्षण, वैद्यकीय उपचार देऊ केले आहेत. आज हा पुरस्कार स्विकारताना शासकीय सेवेत असल्याचा अभिमान वाटणारा क्षण असल्याची भावना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली आहे.