नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा रुगणालयात चक्क तीन बोगस महिला डॉक्टर आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या ओपीडी या बिल्डींगमध्ये या तीन महिला बोगस डॉक्टर आढळून आल्या आहेत. त्या संशयास्पदरित्या रुग्णालयाच्या बिल्डींगमध्ये वावरत होत्या. त्यांच्या गळ्यात स्टेस्थोस्कोपही होता. काही कर्मचाऱ्यांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली. त्यात हा सर्व प्रकार उघड झाला आहे. या तिन्ही बोगस डॉक्टरांना रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत. या बोगस डॉक्टर येथे का आल्या, प्रथमच आल्या की यापूर्वीही आल्या आहेत, त्या येथे येऊन काय करतात यासह अनेक बाबींचा उलगडा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पोलिस या तिघांची कसून चौकशी करीत आहेत. या बोगस डॉक्टरांमध्ये सातपूर येथील दोन्ही तर मनमाड येथील एका महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, यानिमित्ताने जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून रुग्णांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.