नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, नाशिकच्या अध्यक्षपदी विश्वास को-ऑप.बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. सदर बैठकीत कार्याध्यक्षपदी वणी मर्चंट्स को-ऑप. बँकेचे अध्यक्ष महेंद्र किसनलाल बोरा यांची तर उपाध्यक्षपदी येवला मर्चंटचे राजेश शांतीलाल भांडगे यांची निवड करण्यात आली. ही नेमणूक श्रीमती मनिषा खैरनार अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक (वर्ग 1) अधिन-जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्या उपस्थितीत पार पडली. गोविंद नगर येथील बँक असोसिएशनच्या कार्यालयात ही निवड करण्यात आली. नुकतेच असोसिएशनचे 2023 ते 2028 साठी संचालक मंडळ बिनविरोध निवडून आलेले आहे.
विश्वास ठाकूर यांनी बँक्स असोसिएशनवर कार्याध्यक्ष म्हणून 2010, 2012 मध्ये तर अध्यक्ष म्हणून सन 2011-2012, 2021-2022 मध्ये यशस्वीरित्या कार्य केले आहे. संचालक म्हणून सन 2012 ते आजपावेतो कार्यरत आहेत. विश्वास ठाकूर यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून असोसिएशनचे संचालक अजय ब्रम्हेचा होते. दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांनी अनुमोदन दिले. कार्याध्यक्ष पदासाठी महेंद्र बोरा यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून असोसिएशनचे संचालक नानासाहेब सोनवणे होते. तर असोसिएशनच्या संचालिका डॉ. शशीताई अहिरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी राजेश भांडगे यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून दि बिझनेस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष अशोक तापडीया होते. तर मनमाड अर्बन को-ऑप. बँकेचे संचालक संजय वडनेरे यांनी अनुमोदन दिले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विश्वास ठाकूर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांच्या अडीअडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र येण्याची गरज आहे. त्यातुन केंद्र सरकार व राज्य शासनामार्फत निर्णय तोडगा काढता येईल. डिसेंबर 2023 मध्ये नाशिकमध्ये होणार्या सहकार परिषदेसाठी सर्वांचे सहकार्य परिषद यशस्वी होण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे आपल्याला मागण्यांचा पाठपुरावा करता येईल. तसेच असोसिएशन मार्फत अद्ययावत ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यातुन बँकींग क्षेत्रातील आधुनिक बदलांची माहिती होणार आहे.
असोसिएशनचे संचालक व महाराष्ट्र राज्य बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा म्हणाले की, नाशिक जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वाटचाल ही विकासात्मक होत असून त्या माध्यमातून अनेक बँकींग क्षेत्राला दिशा देणारे उपक्रम व कार्यशाळा राबविण्यात येतात. डिसेंबर 2023 मध्ये संपन्न होणारी सहकार परिषद सहकार क्षेत्रासाठी नवे पर्व असणार आहे.
सहकार भारतीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा व असोसिएशनच्या संचालिका डॉ. शशीताई अहिरे म्हणाल्या की, सहकार क्षेत्रात आपण सर्व एकत्र आल्यामुळे ताकद वाढली आहे. त्या माध्यमातून सहकारातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करता येईल. सहकारासाठी काम करण्याची जिद्द बाळगण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली. असोसिएशनचे संचालक नानासाहेब सोनवणे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील सर्व बँकांना जोडून घेणारा व त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी असोसिएशन सदैव तत्पर आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांची आर्थिक स्थिती उत्तम आहे.
नाशिक मर्चंन्ट को-ऑप. बँकेचे संचालक हेमंत धात्रक म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या नवनवीन सुचनांविषयी, परिपत्रकांविषयी नागरी सहकारी बँकांमध्ये माहितीचा पुरेसा अभाव असतो त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. बँकांची थकबाकी वसुली हा कायमच कळीचा मुद्दा आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या प्रश्नांविषयी कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. असोसिएशनचे संचालक राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले की, असोसिएशनच्या दर महिन्याला होणार्या मिटिंगसाठी जास्तीत जास्त संचालकांनी उपस्थित रहावे. त्यातून अनेक विषयांवर विचार मंथन होऊ शकेल.
बिझनेस को-ऑप. बँकेचे अशोक तापडिया यांनी असोसिएशनच्या वाटचालीविषयी गौरवोद्गार काढले व असोसिएशनच्या नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले. नाशिक असोसिएशनचे कार्य महाराष्ट्रातील सहकारासाठी नवा विचार देणारे आहे. असोसिएशनचे संचालक वसंतराव खैरनार म्हणाले की, नाशिक येथे संपन्न होणारी सहकार परिषद ही सहकारातील अनेक प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी दिशा दर्शक ठरणार आहे. त्यातून नाशिक जिल्हा बँक असोसिएशनचे कार्य नव्या जाणीवेतून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
असोसिएशनचे नवनिर्वाचीत उपाध्यक्ष राजेश भांडगे व कार्याध्यक्ष महेंद्र बोरा यांनी आपल्या मनोगतात सहकार क्षेत्रातील नव्या उमेदीने काम करण्यासाठी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा आम्ही विधायक वापर करून सहकार क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करू. बैठकीचे आभार उपाध्यक्ष राजेंद्र भांडगे यांनी मांडले. अशोक श्रीकिसनजी झंवर (श्री महेश को-ऑप बँक लि., नाशिक), सुनिल ताबाजी गिते (नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक, नाशिक), शरद किसनराव कोशिरे (श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक) हिरालाल सुरजकरण सुराणा (प्रगती अर्बन को-ऑप बँक लि.), नितीन एकनाथ वालखेडे (कळवण मर्चंटस् को-ऑप बँक लि.), कैलास हरी येवला (सटाणा मर्चंटस् को-ऑप बँक लि.), शरद नामदेव दुसाने (मालेगांव मर्चंटस् को-ऑप बँक लि.), राजकुमार चंपालाल संकलेचा (चांदवड मर्चंटस् को-ऑप बँक लि.), मिर्झा सलीमबेग जब्बारबेग (दि फैज मर्कंटाईल को-ऑप बँक लि., नाशिक) आदी बैठकीस उपस्थित होते.