नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात एकूण १४ बाजार समित्या आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने बाजार समितींच्या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सर्व बाजार समित्यांचे निकाल लागले आहे. त्यात महाविकास आघाडीने वर्चस्व राखले आहे. तर, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे गटालाच शह दिला आहे.
मालेगावात पालकमंत्री भुसेंना धक्का
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे यांना धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वातील पॅनलने विजयाकडे वाटचाल केली आहे. हिरेंच्या नेतृत्वातील ११ उमेदवारांनी विजय मिळविला आहे. गेल्या १५ वर्षांपासून भुसे यांची बाजार समितीवर सत्ता होती. अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचा सोसायटी गटातून ११ पैकी १० जागांवर विजय झाला आहे. तर एका जागेवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलचे उमेदवार चंद्रकांत शेवाळे निवडून आले आहेत.
येवल्यात भुजबळांचे वर्चस्व
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागा मिळवित भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलने यश मिळविले आहे. येथील विजयी दोन अपक्षही भुजबळांचेच समर्थक आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या नेतृत्वातील गटाला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. दराडेंनी भुजबळांवर विविध आरोप केले होते. त्यामुळे ही निवडणूक राज्यभरात चर्चेची ठरली होती.
लासलगाव बाजार समिती
कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगाव कृउबा मध्ये अद्याप काही जागांची मतमोजणी सुरू आहे. पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलने ७ तर जयदत्त होळकर यांच्या शेतकरी विकास पॅनलला ३ जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी १ अपक्ष निवडून आला आहे.
दिंडोरी बाजार समिती
दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीचे नेते कैलास मावळ यांनी सर्वपक्षीय पॅनल करत ११ जागा जिंकून विद्यमान सभासदांना धोबीपछाड दिला. आहे.
कळवण बाजार समिती
कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांनी माजी आमदार जे. पी. गावित यांना धोबीपछाड दिला. एकूण १८ पैकी तब्बल १५ जागांवर विजय पवार यांच्या नेतृत्वातील पॅनलने मिळवला आहे.
देवळा बाजार समिती
देवळा येथे केदा आहेर-योगेश आहेर यांच्या शेतकरी विकास पॅनलने सोसायटीच्या सातही जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे पॅनलने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे.
घोटी बाजार समिती
घोटीमध्ये लोकनेते गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत बाजार समिती काबीज केलीय. गुळवे यांचे चिरंजीव संदीप गुळवे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली गेली.
सिन्नर बाजार समिती
सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यात अटीतटीची लढत झाली. अखेर दोन्ही पॅनलला प्रत्येकी ८-८ जागा मिळल्या आहेत.
पिंपळगाव बाजार समिती
पिंपळगाव बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी ११ जागा मिळविला आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनलला जोरदार धोबीपछाड दिला आहे. कदम यांच्या पॅनलला ६ जागा मिळाल्या. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
चांदवड बाजार समिती
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वात लोकमान्य परिवर्तन पॅनलला 18 पैकी 10 जागा मिळाल्या असून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या शेतकरी पॅनलला सात जागा मिळाल्यात व एक अपक्ष असा निकाल लागला आहे.
लासलगाव बाजार समिती
लासलगाव येथे भुजबळांना धक्का बसला आहे. पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १८ पैकी ९ जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या पॅनलला ८ जागा मिळल्या आहेत. तर, १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
नाशिक बाजार समिती
नाशिक बाजार समितीमध्ये माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या आपलं पॅनलने ९ जागांद्वारे दणदणीत विजय मिळवला, तर शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी विकास पॅनलला ६ जागा मिळल्या आहेत. येथे ३ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. या तिन्ही जागा आपलं पॅनलच्या आहेत.
Nashik District APMC Election Result Updates