नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0’ या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्यासह नाशिक जिल्ह्यात कृषी फिडर सौर उर्जित करुन सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून कृषीपपांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. जिल्ह्यात एकूण १८८ विद्युत उपकेंद्र सौर उर्जिकरण होणार असून यामधून ७ हजार ९०० एकर जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यात येऊन १ हजार ५८० मेगावॉट वीज निर्मित होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ६९ उपकेंद्राच्या नजीक २ हजार ३६५ एकर तसेच क्लस्टर्सच्या व्यतिरिक्त १७ विद्युत उपकेंद्रांसाठी ६७६ एकरअशी एकूण ३ हजार ४१ एकर शासकीय जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाली असून सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषीपपांना दिवसा वीज पुरवठा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषि वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशा कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करून दिवसा आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. सदर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध व्हावी याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 अंतर्गत नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक ०१, ०२ आणि ०३ अशा तीन क्लस्टर्सची निवड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८४ विद्युत उपकेंद्र सौर उर्जिकरण होणार असून यासाठी एकूण ३ हजार ३४० एकर जमिनीची गरज लागणार आहे.
त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३५ विद्युत उपकेंद्रांसाठी १ हजार ५७२ एकर जमिनीची परिपूर्ण उपलब्धता झालेली आहे. तर ३४ विद्युत उपकेंद्रांसाठी अंशता ७९३ एकर जमिन उपलब्ध झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील क्लस्टर्सच्या व्यतिरिक्त १७ विद्युत उपकेंद्रांसाठी ६७६ एकर जमिन उपलब्ध झाली आहे. अशी एकूण नाशिक जिल्ह्यात ३ हजार ४१ एकर जमीन उपलब्ध झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या जमिनीच्या भाडे करारावर माननीय नाशिक जिल्हाधिकारी यांनी स्वाक्षरी केलेली असून सदर भाडे कराराची दस्त नोंदणीची कार्यवाही सुरु आहे.
Electricity will be supplied to farmers in Nashik district during the day
Nashik District Agriculture Pump Electricity Supply