नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सन २०२१ या वर्षात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय प्रकारांसाठी ३३ लेखक, साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील ८ साहित्यिकांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०२१ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने दि. १० सप्टेंबर २०१२ व दि. २ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. सदर पुरस्काराच्या यादीमध्ये कोणत्या वाङ्मय प्रकारास कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हे आहेत नाशिक जिल्ह्यातील मान्यवर
ज्येष्ठ पत्रकार संपादक सुरेश भटेवरा यांच्या “शोध : गांधी- नेहरू पर्वाचा” या पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार लाभला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी भटेवरा यांना पुरस्कार जाहीर झाला आहे, हा दुर्मिळ योग म्हणावा लागेल. तसेच राजा गायकवाड यांच्या “गढीवरून” या पुस्तकाला श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. राजा गायकवाड हे नाशिक येथे विक्रीकर उपायुक्त म्हणून सेवा करीत आहेत. येवला तालुक्यातील अंदरसुल येथील राजा गायकवाड यांना विनोदी लेखनासाठी हा पुरस्कार मिळणार आहे.
लासलगावच्या सचिन होळकर यांना वसंतराव नाईक पुरस्कार त्यांच्या “शेती: शोध आणि बोध” या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. “उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा” या अरुण गद्रे यांच्या पुस्तकाला महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. गद्रे यांनी आपल्या वैद्यकीय सेवेचा आरंभ व लेखनाचाही आरंभ लासलगाव येथेच केला होता. हे चारही पुरस्कार एक लक्ष रुपयांचे आहेत.
विश्वास जयदेव ठाकूर यांच्या ” नात्यांचे सर्व्हिसिंग ” या लघुकथा संग्रहाला ग.ल ठोकळ पुरस्कार लाभणार आहे. रा भा पाटणकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार डॉ. प्रकाश शेवाळे यांच्या “अनुष्ठुभ नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान” या संशोधनपर पुस्तकाला मिळणार आहे.
बालकवी पुरस्कारावर विवेक उगलमुगले यांची नाम मुद्रा ठसली आहे. “ओन्ली फॉर चिल्ड्रेन ” या बालकविता संग्रहाला हा पुरस्कार लाभणार आहे. बाल साहित्य विभागातच ना.धो. ताम्हणकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार डॉ विद्या सुर्वे बोरसे यांच्या “कोरा कागद निळी शाई” या पुस्तकाला जाहीर झाला आहे. हे पुरस्कार रुपये ५० हजाराचे आहेत. काहींना प्रथम प्रकाशन उपविभागात पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयातील मराठीच्या दोन्ही प्राध्यापकांना यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील एवढ्या लेखकांना पुरस्कार मिळण्याचे हे दुर्मिळ उदाहरण असावे असे वाटते. यापूर्वी दोन किंवा तीन पुरस्कार नाशिकच्या लेखकांना एका वेळी लाभले आहेत. या वर्षी मात्र राज्य पुरस्कारात नाशिकच्या लेखकांनी उच्चांक केला आहे. नाशिक जिल्ह्यातील पुरस्कार विजेते सुरेश भटेवरा, राजा गायकवाड, डॉ अरुण गद्रे, विश्वास ठाकूर, डॉ. प्रकाश शेवाळे, विवेक उगलमुगले, डॉ विद्या सुर्वे बोरसे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Nashik District 8 Author Literature Award