नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ६ देवस्थानांना ब वर्ग दर्जा देण्यात आला आहे. त्यामध्ये येवला तालुक्यातील कोटमगाव प्रसिद्ध श्री.जगदंबा देवस्थान, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील श्री रेणुका माता मंदिर,देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री.रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान तसेच पिंपळगाव बसवंत येथील श्री. क्षेत्र श्रीराम मंदिर यांचा समावेश आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला. या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने या तीर्थक्षेत्राच्या विविध विकास कामांसाठी शासनाकडून लवकरच अधिक निधी प्राप्त होऊन या देवस्थानच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या मूलभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे.
येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री. जगदंबा देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, स्वच्छता गृह, पाण्याची सुविधा, परिसर सुशोभिकरण यासह विविध विकासाची कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविक या ठिकाणी अधिक मोठ्या संख्येने येत असतात. या भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यासाठी या देवस्थानास ब वर्ग दर्जा प्राप्त व्हावा याकरिता मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता.
येवला तालुक्यातील या प्रसिद्ध देवस्थानाला ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने पर्यटन तसेच यात्रास्थळ विकास योजने अंतर्गत याठिकाणी अधिक सुविधा प्राप्त करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. परिणामी याठिकाणी भाविक अधिक मोठ्या संख्येने येऊन पर्यटनात देखील वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील अर्थकारणाला देखील अधिक गती प्राप्त होणार आहे.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील श्री रेणुका माता मंदिर, देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री.रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान , तसेच पिंपळगाव बसवंत येथील श्री. क्षेत्र श्रीराम मंदिर यांना देखील ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.