नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या गावात घडल्या आहेत. पहिल्या घटनेत देवगाव शिवारातील पोटे वस्तीजवळ एका विहिरीत दीर आणि भावजायीचा मृतदेह आढळला आहे. तर दुसऱ्या घटनेत सटाणा तालुक्यात एका मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगाव शिवाराजवळच्या एका विहिरीत एका महिलेचा आज सकाळी मृतदेह तरंगताना आढळला. पायल रमेश पोटे (वय १९) असे मृत महिलेचे नाव आहे. गावाचे पोलिसपाटील सुनील बोचरे यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी मृतदेह काढण्याची तयारी सुरू केली असता विरोध करण्यात आला. महिलेचे नातेवाईक वैजापूरवरून आल्यानंतर मृतदेह काढावा, अशी मागणी करण्यात आली. नातेवाईक आल्यानंतर महिलेचा मृतदेह काढण्यात आला. मात्र महिलेच्या मृतदेहाजवळ पुरुषाची चपला तरंगताना दिसून आल्या. विहिरीत आणखी एक मृतदेह असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी विहिरीतून संपूर्ण पाणी उपसा केले. तेव्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळला. संदीप एकनाथ पोटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत पुरुष महिलेचा दीर असल्याचे समजते. दोघांचे मृतदेह एकाच विहिरीत आढळल्याने हा घातपात आहे की आत्महत्या याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.
दुसरी घटना सटाणा तालुक्यातील ठेंगोडा आणि आराई गावाच्या सीमेवरील एका शेतात घडली. एक शेतमजूर पाणी पिण्यासाठी विहिरीजवळ गेला असता तो पाय घसरून विहिरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. धनंजय रमेश जाधव (आराई, वय २०) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. रमेश सकाळी कामासाठी गेला होता. दुपारी तहान लागल्यामुळे तो एका विहिरीजवळ गेला. पाणी पिताना त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला.