नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगावर गरम पाणी पडल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. एक घटना मनमाड तालुक्यातील आहेत. तर, दुसरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे. घरातील मुलांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास अशा हृदयद्रावक प्रसंगाला सामोरे जावे लागते.
मनमाड तालुक्यातील घटना
मनमाड तालुक्यातील रापली रोड वरील केकाण नगर येथे एक दुर्घटना घडली आहे. ओंकार सुनिल बोरसे (वय २ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. ओंकार हा गेल्या महिन्यात घरामध्ये खेळत होता. त्याचवेळी त्याची आई घरात स्वयंपाक करीत होती. आई गॅसवर अंडी उकडवित होती. त्याचवेळी ओंकार खेळता खेळता तेथे आला आणि त्याने गॅसची शेगडी ओढली. त्यामुळे गॅसवरील उकळते पाणी ओंकारच्या अंगावर पडले. त्यामुळे तो भाजला. त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. तेथून त्याला नाशिक शहरातील आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना
सारस्ते गावात एक घटना घडली आहे. यात ६ वर्षे वयाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास घरामध्ये आंघोळीसाठी गरम पाणी ठेवण्यात आले होते. या गरम पाण्याच्या भांड्याजवळ हा बालक गेला. आणि ते गरम पाणी त्याच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत तो गंभीररित्या भाजला. आजोबा मंगळू सोनू चौधरी यांनी या बालकाला हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर त्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.
Nashik District 2 Children’s Death Hot Water Burn