दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली असून आता बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. आता तर १० वर्षीय बालक ठार झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
निळवंडी येथील करण मच्छिंद्र गवारी हा जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिक्षण घेतो. करण हा शाळा सुटल्यावर वस्तीवरील आपल्या घरी चार पाच मित्रांसोबत इमानवाडी परिसरात वाघाड कॅनॉल जवळून जात होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यावर हल्ला केला. बिबट्याने करणला झुडपात नेले. इतर विद्यार्थ्यांनी घाबरून मदतीसाठी आरोळ्या ठोकल्या. आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत करणला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करणसा तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वनविभागाने तसेच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बिबट्याला पाडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी दिंडोरी तालुक्यातील म्हेंळुस्के,लखमापूर,परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात काही बालक ठार झाले आहेत. .या घटनेने दिंडोरी तालुक्यात घबराट पसरली असून वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
रक्ताचे थारोळे आणि अस्ताव्यस्त दप्तर
नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेतून पाठीवर दप्तर घेत परतणाऱ्या करण यास बिबट्याने वाघाड कालव्या लगत हल्ला केला. त्याला बाजूला झुडपात नेले. शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. मात्र करण बिबट्याचे हल्ल्यात गंभीर जखमी झाला. बाजूला रक्ताचे थारोळे साचले अन करणचे दप्तरही अस्तव्यस्त पडले. त्यात नव्याने घेतलेला बॉलपेन रक्ताने माखत पडला होता. त्याच्या कुटुंबीयांचा अक्रोश पाहून अनेकांचे मन हेलावले आहे.
nashik dindori taluka leopard attack on 10 year student killed victim