नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीमधील कलानगरमध्ये श्री सिद्धकलेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इच्छापूर्ती रिद्धी सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २१ फेब्रुवारीपासून या सोहळ्याला प्रारंभ झाला. आज दुपारपर्यंत हा सोहळा अभूतपूर्व उत्साहात सुरू होता.
मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी भव्य शोभायात्रेने सोहळ्याला प्रारंभ झाला. बुधवार २२ फेब्रुवारी रोजी शांतीपाठ, प्रधान संकल्प, गणपती पुजन, पुण्यहवाचन, वास्तूमंडल स्थापना, योगिनी मंडल, क्षेत्रपाल मंडल, श्री महादेव मूर्ती जलाधिवास, नवग्रह स्थापना असे बहुविध कार्यक्रम झाले. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी प्रातः पुजन, प्रधान हवन, ब्रह्मशिव पुजन, क्रमशिला पुजन स्थापना, महामूर्ती स्थापना विधी, औषधी स्थान, मूर्तीलोकपाल हवन, महादेव मूर्ती ध्यानधिवास, शौर्यधिवास आदी विधी संपन्न झाले. आज, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. स्थापित देवता पुजन, प्रधान हवन, उत्तरांग हवन, बलीदान, महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण पुर्णाहुती, दान संकल्प, यश समाप्ती, नैवेद्य, आरती आणि महाप्रसाद हे कार्यक्रम संपन्न झाले.
या सोहळ्यासाठी श्री श्री महामंडलेश्वर १००८ संतोष गिरी महाराज यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते मंदिर प्राणप्रतिष्ठान संपन्न झाले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील निरगुडे, सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासदांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टने अतिशय अचूक नियोजन केले. स्थानिक नागरिकांचे सहकार्य त्यास लाभले. या सोहळ्यामुळे कलानगर परिसरातील वातावरण शिवमय झाले होते.
Nashik Dindori Kalanagar Shiv Temple Murti Mahotsav