नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये लाचखोरीने कळस गाठला आहे. गेल्या सहा महिन्यात अनेक लाचखोरांवर कारवाई झाली आहे. त्यात मोठ्या धेंडांचाही समावेश आहे. आताही एक मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अडकला आहे. दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) डॉ. निलेश अपार हा तब्बल ४० लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या सापळ्यात सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रचंड लाचखोरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आठवड्याला किमान २ जण तरी लाच घेताना पकडले जात आहेत. एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात जोरदार कारवाई आहे. त्यामुळे तक्रारदारांचे प्रमाणही वाढत असून लाचखोर दिवसागणिक समोर येत आहेत. आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक, शिक्षणाधिकारी यासारखे बडे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. आताही महसूल विभागातील क्लास वन अधिकारी एसीबीच्या गळाला लागला आहे.
दिंडोरीचा उपविभागीय अधिकारी निलेश अपार हा एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. एका खाजगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी अपार याने तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि अपार हा ४० लाखांची लाच प्रकरणात सापडला आहे. याप्रकरणी एसीबीच्या पथकाकडून अपार याची चौकशी सुरू असून दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
प्रांत कार्यालयात काय झालं
प्रांत कार्यालयात डॉ. अपार हा विविध प्रकारच्या सुनावण्या घेत होता. त्यामुळे तालुक्यासह विविध दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिक त्यांच्या याचिकांसाठी कार्यालयात आले होते. तेथे वकीलही हजर होते. दुपारच्या सुमारास एसीबीचे पथक या कार्यालयात दाखल झाले. डॉ. अपार याच्या केबिनमध्येच एसीबीच्या पथकाने सापळा लावला आणि त्यात तो अडकला. बराच वेळ झाला तरी पूर्वनियोजित सुनावणीसाठी नाव का पुकारले जात नाही म्हणून अनेकांनी चौकशी केली. मात्र, साहेबांकडे पाहुणे आले आहेत तुमची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तुमचे वकील तुम्हाला पुढची तारीख कळवतील, असा संदेश डॉ. अपारच्या कार्यालयाकडून संबंधितांना दिला जात होता. अखेर काही तासांनी स्पष्ट झाले की डॉ. अपार हा तब्बल ४० लाखांची लाच घेताना जाळ्यात अडकला आहे.
दाखले प्रलंबित
सध्या शैक्षणिक प्रवेशाची लगबग सुरू आहे. त्यासाठी जात प्रमाणपण, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, क्रिमिलेअर, नॉन क्रिमिलेअर यासारखी विविध प्रमाणपत्र उपविभागीय कार्यालयाकडून दिले जातात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून दाखले वितरीत होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच आता डॉ. अपार हा लाच घेताना सापडल्याने आमच्या दाखल्यांचे काय होणार असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून विचारला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आता या परिस्थितीची दखल घेत तातडीने दाखले वितरणाची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,
लाचखोर अधिकाऱ्याचे नाव – डॉ. निलेश अपार वय 37 वर्ष, व्यवसाय – उपविभागीय अधिकारी, वर्ग 1, उपविभाग दिंडोरी, जि. नाशिक (रा. स्वामी बंगला, शासकीय विश्रामग्रह दिंडोरी, जि. नाशिक)
एका उद्योजकाची दिंडोरी येथे कंपनी आहे. या कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषिक परवानगी (एनए) न घेतली नाही. त्यामुळे प्रांत डॉ. अपार याने कंपनीस नोटीस बजावली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी इशारा दिला होता. या कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ. अपार याने उद्योजकाकडे थेट ५० लाख रुपयांची मागणी केली, तसेच तडजोडी अंती ४० लाख रुपयेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सापळा अधिकारी
नरेंद्र पवार, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक-
पो.नि. संदिप साळुंखे.
पो.हवा. डोंगरे
पो.हवा. इंगळे
*मार्गदर्शक –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक मो नं 9404333049
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
टोल फ्री क्रमांक – १०६४ .