नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्पच्या विजय नगर भागातील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये एक दुर्घटना घडली आहे. घरात लावलेल्या दिव्यामुळे घरातील अनेक बाबी जळून खाक झाल्या आहेत. घरात कुणीही नव्हते. आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांनी देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्ड अग्निशमन विभागाला दिली.
देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्ड अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विजय नगर मधील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये वासुदेव पिल्ले यांचे घर आहे. या घरातून धुराचे लोट निघत असल्याचे शेजारच्या नागरिकांना दिसून आले. त्यांनी तातडीने कॅन्टोन्मेंट बोर्ड अग्निशमन दलाला माहिती दिली. तातडीने अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. घरातील आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, घरातील अनेक ग्रहपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस सिलेंडर बाहेर काढत पाण्याचा मारा केल्याने पुढील हानी टळली. यावेळी अग्निशमन दलाचे भाऊसाहेब सानप ,जयदीप निसाळ, विनोद लोखंडे, कुणाल पगारे आदिनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.