देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील कनकापुर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढण्यात येऊन जंगलात सोडून देण्यात आले. विहिरीत पडलेल्या या बछड्याला बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विहिरीत खाट सोडून बछड्याला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. वन विभागाला याची कल्पना दिल्यावर देखील वन विभाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, कनकापूर -कांचणे रस्त्यालगत लक्ष्मण आनंदा शिंदे यांची विहीर आहे. नेहमीप्रमाणे शिंदे यांनी विहिरीत डोकावून बघितल्यावर त्यांना बिबट्याचे बछडे पडले असल्याचे दिसून आले. सदर घटनेची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना समजताच त्यांनी बछड्याला बघण्यासाठी विविरीजवळ गर्दी केली. वन विभागाला याची कल्पना दिल्यानंतर बछडयाला बाहेर काढण्यासाठी विहीर मालक शिंदे यांनी विहिरीत खाट सोडून त्याला बाहेर काढले.
कॅरेट मधून सोडण्यात आले
एका कॅरेट मध्ये पकडून जवळच असलेल्या जंगलात सोडून देण्यात आले. ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. या परिसराला लागून ऐतिहासिक कांचन किल्ला आहे. या परिसरता बिबट्याची दहशत आहे. पाण्यासाठी त्यांची भटंकती सुरु असते. बछड्याने पाणी पिण्यासाठी विहिरीत उडी घेतल्याचा यावेळी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी याठिकाणी पिंजऱ्याची व्यवस्था करावी ,अशी मागणी येथील रहिवाश्यांच्या केली आहे .
Nashik Deola Leopard Well Rescues Operation