नाशिक – कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे नाशिकसह २२ जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात डेल्टा व्हेरिएंटची रुग्ण संख्या शुन्यावर आली होती. पण, आता नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. एकाच वेळी ३० जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी ३० जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे. एकूण १५५ सॅंपल्स तपासणीसाठी पाठवले होते.त्यापैकी ३० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात २८ जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात २ रुग्ण आढळले आहे. सर्व रुग्ण हे आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली आहे.
जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण २१ रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. त्यानंतर राज्य सरकारने ३६ जिल्ह्यांतून सॅंम्पल तपासणीसाठी पाठवले होते आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात होती. अखेरीस राज्य सरकारच्या या लढ्याला जुलै महिन्यात यश आले होते. १४ जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यांतून १०० नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात २१ रुग्ण आढळले होते. पण आता नवीन रुग्ण आढळले नाही’ असं जाहीर सुद्धा केलं होतं. पण, आता नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
डेल्टा प्लस
डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2’ याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता. विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.
—
राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेला नाशिकमधून १५५ नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील ३० नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आले आहेत. ज्या तालुक्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी