नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्पाईसजेट या विमानसेवा कंपनीच्या कारभाराचा आज नाशिकहून दिल्लीला आलेल्या प्रवाशांना प्रचंड फटका बसला. नाशिकचे प्रवासी दिल्लीत आले खरे पण त्यांना त्यांचे सामान (बॅगा) या दिल्लीत मिळाल्याच नाहीत. अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतरही त्यांना सामान मिळाले नाही. अखेर हे सामान्य नाशिकलाच असल्याची माहिती दिल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
स्पाईसजेट कंपनीद्वारे नाशिकहून दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे. कंपनीची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. त्यामुळेच कंपनीने तुर्कीश विमानसेवा कंपनीशी करार केला आहे. याच कंपनीच्या काही विमानाद्वारे सध्या देशांतर्गत काही शहरांसाठी सेवा दिली जात आहे. त्यातीलच एक विमान सध्या नाशिकसाठी विमानसेवा देत आहे. सध्या दिवाळीचा सण आहे. त्यातच बच्चे कंपनीला सुट्या आहे. त्यामुळे अनेकांनी पर्यटनाला पसंती दिली आहे. परिणामी, दिवाळीच्या सणातच विमानसेवेचे तिकीच प्रचंड महाग आहे. नाशिक-दिल्ली विमानसेवेचे तिकीटही हजारो रुपयांना विक्री झाले आहे. अशातच आज, मंगळवार (२५ ऑक्टोबर) नाशिकहून दिल्लीला आलेल्या विमान प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
दिल्लीला पोहचताच प्रवाशांना ठराविक क्रमांकाच्या बेल्टच्या ठिकाणी सामान घेण्यासाठी सांगण्यात आले. तेथे तब्बल १ ते दीड तास वाट पाहिल्यानंतर प्रवाशांना सामान मिळाले नाही. त्यानंतर प्रवाशांना अकांडतांडव केले असता समोर आले की, प्रवाशांचे सामान दिल्लीत आलेलेच नाही. त्यामुळे प्रवाशांचा आणखीनच संताप झाला. कारण, यातील अनेक प्रवासी हे पर्यटनासाठी पुढे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासह विविध भागांमध्ये जाणारे होते. त्यांना सामानच मिळाले नाही त्यामुळे नियोजित ठिकाणावर जायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला. आम्ही आपले सामान आपल्यापर्यंत उद्या नक्की पोहचवू असे कंपनीने आश्वस्त केले पण त्याने प्रवाशांचे समाधान झाले नाही. काही प्रवाशांना तर परदेशात जायचे होते. हा वाद बराच वेळ चालला. अखेर कंपनीने या गैरसोयीपोटी प्रवाशांना काही पैसे देऊ केले आहेत.
हा घोळ का आणि कसा झाला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा पायलट, क्रू सदस्य आणि ग्राऊंड हँडलींग करणारे कर्मचारी यांच्यातील असमन्वयामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. त्याची शिक्षा प्रवाशांना भोगावी लागत आहे. नियोजित वेळेपेक्षा तासभऱ उशीराने विमान दिल्लीकडे झेपावले. त्यातच प्रवाशांना त्यांचे सामानच मिळालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
Nashik Delhi Flight Passengers Luggage Issue