विशेष प्रतिनिधी, नाशिक
शहर परिसरासह जिह्यात चक्कर येण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. श्वास घेण्यास त्रास तसेच चक्कर येवून पडल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी (दि.२५) दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरवाड्यात २५ हून अधिक जणांचा याच कारणातून बळी गेला आहे. कोरोनाच्या महामारीनेच या सर्वांचा जीव घेतल्याचे बोलले जात असले तरी, या मृत्यू मागे विविध कारणे असल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
देवळाली कॅम्प रोडवरील बनाचाळ भागात राहणारे विनोद अशफिलाल कनोजिया (५७) यांना रविवारी आपल्या घरात असतांना अचानक घाम येवून श्वास घेण्यास त्रास झाल्याने कुटूंबियांनी त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.
दुसरी घटना उंटवाडी रोड भागात घडली. शिवाजी केरू पवार (६५ रा. क्रांतीनगर झोपडपट्टी,आदिवासी हौ.सोसा.) यांना शनिवारी रात्री आनक श्वास घेण्यास त्रास झाल्याने कुटूंबियांना त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपसा हवालदार शिंदे करीत आहेत.
गंगापूर रोडवरील शंकरनगर भागात राहणारे प्रेम धने गोसावी (४० रा.व्हिला सदन,) यांना रविवारी अचानक छातीत दुखून श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने कुटूंबियांनी त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक खैरणार करीत आहेत.
हनुमानवाडीतील कमलाबाई भिमा बुरूंगे (७० रा.मोरे मळा) या वृध्दा रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडल्या होत्या. कुटूंबियांनी त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
दिंडोरीरोडवरील कुलकर्णी फार्म भागात राहणारे नारायण सुकलाल निकुंभ (६९ रा.गोकूळ धाम अपा.) हे रविवारी आपल्या घरात चक्कर येवून पडले होते. कुटूंबियांनी त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीसात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.
शिंदे गावातील लहानू रामभाऊ धोगाड (३५ रा.हनुमान मंदिराजवळ) हा युवक रविवारी आपल्या राहत्या घरात बाथरूममध्ये चक्कर येवून पडला होता. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.