नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हौसला एनजीओ ने नाशिकमधील ‘पडसाद अपंग उपचार आणि पुनर्वसन केंद्र’ येथे ‘पेंट अ ड्रीम’ उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये हौसला स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी पडसाद या कर्णबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत भिंतीवर सुंदर रंगरंगोटी करून आनंद साजरा केला. यावेळी पडसाद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमाचा खूप आनंद घेतला आणि व्यावसायिक चित्रकारांप्रमाणे आपली कला सादर केली.
हौसला एनजीओने पडसाद शाळेची भिंत आकर्षक रंगात आणि मुलांना आवडेल अशी चित्रे रंगवली. एकूणच रंग आणि प्रेम यांच्याद्वारे दयाळूपणा पसरवण्यासाठी एकप्रकारे संवादात्मक आणि मजेदार असा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना शिकण्याची गोडी निर्माण व्हावी, शाळेत येण्याची प्रेरणा मिळावी व त्यांना शिकता यावे या उद्देशाने शाळेच्या बाहेरील भिंतीला आकर्षक रंगरंगोटी करून देण्यात आली. या कर्णबधीर विद्यार्थ्यांकडे असलेली विशेष आकलनशक्ती व अनेक गोष्टी माहीत करून घेण्याबद्दलची आवड या मधून दिसून आली.
यावेळी हौसला एनजीओ च्या सदस्यांसोबत शाळेतील सर्व मुलामुलींनी देखील भिंतीवर हे चित्र काढण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. पडसाद शाळेची हि भिंत आकर्षक पद्धतीने रंगवण्यासाठी हौसला संस्थेच्या गौरी चव्हाण, कांचन साठे, लीना जोग, उमैमा इंदोरवाला, ऐश्वर्या घाडगे, ऐश्वर्या काल्या, स्नेहा लाड, प्रियांका देशपांडे, रश्मी धामणे, कोमल जैन, प्रसाद गर्भे, आशिष लकारिया, योगीराज मालेगावकर, निखील परदेशी, प्रिया पाटील हे या उपक्रमात सहभागी झाले होते.
Nashik Deaf Students Painting Initiative