नाशिक – कर्करोग तथा कॅन्सर ही मानवी आरोग्याची आजच्या काळात सर्वात मोठी समस्या मानली जाते. मधुमेह, हृदयविकार या प्रमाणेच कॅन्सर हा आजार मानवी जीवनासाठी अत्यंत घातक ठरणारा आहे. त्यातच महिलांसाठी स्तनांचा कर्करोग हा अत्यंत जीवघेणा आजार समजला जातो. आता तर दहा पैकी ६ ते ७ जणांना कॅन्सर असल्याचे समोर येत असल्याने चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे.
कॅन्सरच्या निदानासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु संकोच यामुळे महिला स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी तयार होत नसतात. मात्र आता घरच्या घरी स्तनांचा कर्करोग तपासणी करता येणे शक्य होणार आहे. नाशिकच्या दातार कॅन्सर जेनेटिक्स या लॅबने विकसित केलेली ही चाचणी आता जगमान्य होणार आहे. अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) या रक्त चाचणीला मान्यता दिली आहे. भारतातच विकसित केलेल्या रक्त चाचणीतून प्रारंभिक अवस्थेमध्येच स्तनाच्या कर्करोगाचे निदान होणार आहे. या चाचणीला ‘ब्रेकथ्रू’ असे पदनाम देण्यात आले आहे. दातार कॅन्सर जेनेटिक्स ही कर्करोगावर कार्यरत असणारी वैश्विक स्वरुपाची संशोधन लॅब आहे. त्यात कर्करोगाचे निदान, उपचार, निर्णय आणि व्यवस्थापनासाठी वैद्यकीय तंत्रांमध्ये मोठे कार्य केले जात आहे.
दातार लॅबने विकसित केलेल्या ही नवी चाचणी ९९ टक्क्यांहून अधिक अचूक आहे. स्तनाचा कर्करोग शोधण्याचा एक सोपा मार्ग निर्माण झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. ‘ब्रेकथ्रू’ ही गंभीर स्थितीवर उपचार करण्याच्या उद्देशाने औषधांचा विकास आणि पुनरावलोकन जलद करण्यासाठी डिझाइन केलेली प्रक्रिया आहे. त्याचे प्राथमिक क्लिनिकल पुरावे सूचित करतात की, उपलब्ध थेरपीपेक्षा यात लक्षणीय सुधारणा दर्शवू शकते. दातार लॅबने ट्यूमर पेशी आणि क्लस्टर-विशिष्ट ब्रेस्ट कॅन्सर अचूकतेने शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या संदर्भात लॅबने एका निवेदनात म्हटले आहे की, चाचणीसाठी फक्त पाच मिलीग्रॅम रक्त आवश्यक आहे. त्यात मॅमोग्राफीशी संबंधित कोणत्याही रेडिएशन किंवा अस्वस्थतेचा समावेश नाही.
दातार कॅन्सर जेनेटिक्सचे अध्यक्ष राजन दातार म्हणाले की, ४० वर्षांवरील स्त्रिया घरीच त्यांच्या सोयीनुसार आणि गोपनीयतेतून डॉक्टरांच्या सल्ल्याने स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित रक्त तपासणी करू शकतात. आता तर अमेरिकेच्या एफडीएनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे अमेरिकेतील महिलांनाही या चाचणीचा लाभ घेता येईल. जगभरातच स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यात ही चाचणी क्रांती घडवणार आहे. भारतातील आमच्या शास्त्रज्ञांनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी देशाला जागतिक कर्करोग संशोधनाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, असेही दातार म्हणाले.
दातार लॅबने विकसित केलेली ही चाचणी युरोपियन बाजारपेठेत यापूर्वीच उपलब्ध झाली आहे. लवकरच ईझी चेक (EasyCheck) या ब्रँड नावाने ती भारतात येणार आहे. लॅबने अद्याप या रक्त चाचणीची किंमती जाहीर केलेली नाही. या चाचणीचा दर माफक असावा यासाठी लॅबच्यावतीने आघाडीच्या आरोग्य सेवा संस्थांशी चर्चा केली जात आहे.