मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेंदूच्या कर्करोगाच्या निदानात मदत करण्यासाठी नाशिकमधील दातार कॅन्सर जेनेटिक्सने विकसित केलेल्या ‘TriNetra-GlioTM या रक्तचाचणीसाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (US-FDA) ‘क्रांतिकारी संशोधन” म्हणजेच ‘ब्रेकथ्रू’ मंजूर केले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडून ब्रेकथ्रू मिळालेली ही कंपनीची तिसरी चाचणी आहे. कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्तन आणि प्रोस्टेट कर्करोग शोधचाचणी ही ब्रेकथ्रू डिव्हाइस पदनाम प्राप्त करणारी पहिली लिक्विड बायोप्सी होती.
मेंदूचा कर्करोग भारतातला 10 वा सर्वात प्राणघातक कर्करोग आहे आणि दरवर्षी 26,000 पेक्षा जास्त प्रौढांचा या आजारामुळे मृत्यू होतो. मेंदूच्या कर्करोगाचे निदान अत्यंत जोखमीचे आणि संसाधन-केंद्रित असून जवळजवळ ४०% प्रगत अवस्थेतील मेंदूच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मेंदूची बायोप्सी करणे केवळ अशक्य असते. जगभरात सध्या मेंदूच्या कर्करोगाच्या निदानासाठी कोणतीही रक्त चाचणी नाही आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल मूल्यांकनासाठी ट्यूमर टिश्यू मिळविण्यासाठी डॉक्टरांना जटिल शस्त्रक्रिया प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागते. ‘TriNetra-GlioTM लिक्विड बायोप्सीचा उद्देश मेंदूच्या गाठीतून रक्तात सोडल्या गेलेल्या अत्यंत दुर्मिळ पेशी शोधणे हा आहे.
इम्पीरियल कॉलेज, लंडन येथील एका संशोधन पथकाने केलेल्या प्रोस्पेक्टीव ब्लाइंडेड संशोधनाने ही चाचणी अत्यंत अचूक असल्याचे दाखवले आहे. ज्या रुग्णांमध्ये मेंदूची बायोप्सी अत्यावश्यक असूनही केली जाऊ शकत नाही किंवा बायोप्सी अयशस्वी होते, अशा रुग्णांसाठी असलेल्या ह्या चाचणीसाठी केवळ १५ मिली रक्तनमुना घेतला जातो.
“रक्तामध्ये परिसंचारी ट्यूमर पेशी (Circulating Tumor Cells-CTCs) शोधणारी ही नॉन-इनवेसिव्ह रक्तचाचणी मेंदूच्या कर्करोगाच्या गुंतागुंतीच्या निदानाशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण करण्यात मदत करेल असे माझे मत आहे. शस्त्रक्रिया करताना ट्युमरची कार्यात्मक सीमा परिभाषित करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करणारा मी एक सर्जन असल्याने, अत्यंत अचूकपणे माहिती देणारे हे तंत्रज्ञान मला विशेष महत्त्वपूर्ण वाटत आहे. विशेषतः, जिथे दुर्गम ट्युमर आहे तिथे साध्या रक्तचाचणीतून म्हणजेच लिक्विड बायोप्सी च्या माध्यमातून निदान केले गेले तर क्लिनिकल प्राक्टीस मधील एक निकडीची गरज पूर्ण होईल. ही लिक्विड बायोप्सी अत्यंत संवेदनशील आणि स्पेसिफिक असल्याचे मी स्वतः अनुभवले आहे. आतापर्यंत लिक्विड बायोप्सी रोगाचे आण्विक (डीएनए) निर्देशक शोधण्यावर आधारित होती परंतु या तंत्रज्ञानामध्ये कर्करोगाच्या जिवंत पेशी यशस्वीपणे शोधल्या जात असल्यामुळे त्याची उपयुक्तता आहे बरीच जास्त आहे.” असे न्यूरोसर्जन डॉ. केविन ओ’नील यांनी सांगितले . डॉ ओ’नील ब्रेन ट्यूमर संशोधन मोहिमेचे अध्यक्ष तसेच ब्रेन ट्यूमर रिसर्च चॅरिटीचे प्रमुख अन्वेषक असून, सेंटर ऑफ एक्सलन्स, इंपीरियल कॉलेज, लंडन येथे कार्यरत आहेत. त्यांनी या मेंदूच्या कर्करोगावरील चाचणीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रोस्पेक्टीव ब्लाइंडेड संशोधनाचे नेतृत्व केले होते.
“क्लिनिकल संशोधनाचा हा डेटा खरोखरच खूप प्रभावशाली आहे. दातार कॅन्सर जेनेटिक्सकडून आलेली आतापर्यंतची ही तिसरी आणि सर्वात महत्त्वाची ‘क्रांतीकारी” अशी चाचणी आहे. यात क्लिनिकल प्राक्टिस बदलून टाकण्याची आणि मेंदूचे दुर्गम ट्युमर असलेल्या रोग्यांना मदत करण्याची मोठी क्षमता आहे. भारतीय विज्ञानासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे आणि जागतिक स्तरावर कर्करोग संशोधनामधील एक महत्त्वाचे योगदान आहे” असे कर्करोगतज्ञ डॉ. सेवंती लिमये यांनी सांगितले. डॉ लिमये मुंबईमधील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी विभाग तसेच ऑन्कोलॉजी संशोधन विभागाच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत.
दातार कॅन्सर जेनेटिक्सला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने दिलेले ‘क्रांतिकारी संशोधन’ हे मानांकन म्हणजे चाचणीमागील तंत्रज्ञानाला मिळालेली एक प्रकारची अधिकृत मान्यताच आहे, असे कंपनीच्या वैद्यकीय संचालक डॉ. दर्शना पाटील म्हणाल्या. कंपनीने विकसित केलेल्या ट्युमर पेशी संवर्धन आणि शोध यांच्या विशेष तंत्रज्ञानामुळेच ही नॉन-इनवेसिव्ह चाचणी मेंदूच्या ट्यूमर सारख्या अत्यंत आव्हानात्मक कर्करोगाचे अचूक निदान करू शकते. या चाचणीला यापूर्वी युरोपमध्ये ‘सीई’ प्रमाणपत्रही मिळाले आहे.
विश्लेषणात्मक आणि नैदानिक यशाची वाजवी अपेक्षा पूर्ण करून कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगांचे अधिक प्रभावी निदान करण्याची क्षमता दर्शविणार्या उपकरणांसाठी कठोर मूल्यांकनानंतर अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनातर्फे ब्रेकथ्रू पदनाम दिले जाते. रुग्णांना आणि आरोग्यसेवा प्रदात्यांना अशा चाचण्या आणि उपकरणे तातडीने उपलब्ध व्हावेत या हेतूने ब्रेकथ्रू प्रोग्राममध्ये टेस्ट आणि डिव्हाइसेसचा विकास आणि मूल्यांकन जलद गतीने करण्याला प्राधान्य दिले जाते.
दातार कॅन्सर जेनेटिक्स
दातार कॅन्सर जेनेटिक्स कर्करोग संशोधनात जगभरात एक अग्रगण्य असलेली कंपनी असून नॉनइंव्हेसीव तंत्रज्ञानाचा वापर अचूक निदान आणि कर्करोगाच्या उपाय योजनेसाठी करण्यामध्ये त्यांचे खास वैशिष्य आहे. कंपनीचे अत्याधुनिक संशोधन केंद्र NABL, ISO, CAP, CLIA प्रमाणित असून ती इंग्लंड, युरोप, अमेरिका, आखाती देश आणि भारतातील कर्करोग व कर्करोग संशयित रुग्णांना सेवा देते. कंपनीच्या आधुनिक कर्करोग संशोधन सुविधा भारत, इंग्लंड आणि अमेरिका येथे उपलब्ध आहेत.
अतिशय महत्त्वाचे
– बायोप्सी करणे अशक्य असलेल्या मेंदूच्या कर्करोगाचे निदान करण्यात मदत करण्यासाठी दातार कॅन्सर जेनेटिक्सने लिक्विड बायोप्सी विकसित केली आहे.
– इम्पीरियल कॉलेज, लंडन येथील एका संशोधन पथकाने केलेल्या प्रोस्पेक्टीव ब्लाइंडेड संशोधनात मेंदूचा घातक कर्करोग शोधण्यात या तपासणीने मोठी अचूकता दर्शविली आहे.
– दातार कॅन्सर जेनेटिक्सला आतापर्यंत अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे तीन वेळा ‘क्रांतिकारी संशोधन” (ब्रेकथ्रू डेसिग्नेशन) मानांकन दिले गेले आहे, ज्यामध्ये मेंदूच्या कर्करोगाबरोबरच स्तन आणि प्रोस्टेटचा कर्करोग शोधण्यासाठी उपलब्ध असलेल्या लिक्विड बायोप्सीचा समावेश आहे.
Nashik Datar Cancer Genetics Brain Biopsy Blood Test USA FDA Approval
Historic Success Indian Research