घोटी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरात दारणा नदीपात्रात दोन सख्खे भाऊ बुडाल्याची घटना समोर आली आहे. हे दोघे जण मासेमारी करायला गेले होते. आज, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस आणि बचाव पथकाला पाचारण केले असून बचावकार्य सुरु करण्यात आले. मात्र, अंधार पडल्याने काम थांबवण्यात आले. आता सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्य केले जाणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज काशिनाथ पिंगळे आणि कृष्णा काशिनाथ पिंगळे (रा. आवळखेड) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. रविवारी सकाळी आवळखेड येथील काही युवक इगतपुरी तालुक्यातील देवळे गावाजवळील दारणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी एक भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र भावाला वाचवत काठावर आणीत असतांना अचानक दोघेही पुन्हा पाण्यात पडल्याने बुडाले.
या युवकांना शोधण्यासाठी स्थानिक नागरिक व पोलीसांनी प्रयत्न केले. मात्र ते सापडले नाहीत. अखेर पोलिसांनी कसारा येथील आपत्ती टीमला घटनास्थळी पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत या युवकांना शोधण्याचे काम सुरु होते. या दुर्देवी घटनेमुळे आवळखेड गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nashik Darna River 2 Brothers Drowned