नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रविवार कारंजा येथील तेली गल्लीत असलेल्या सुखलाल दगडू तेली चांदवडकर (दुकान क्रमांक तीन) वर आज वनविभागाने छापा टाकला. दुकानात वन्यजीवांचे अवयव आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वनविभागाने पंचनामा केला आहे. त्याच्याआधारे दुकान मालाकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आणि वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवार कारंजावरील तेली गल्ली येथे दगडू तेली नावाने प्रख्यात दुकाने आहेत. त्यातील दुकान क्रमांक तीनमध्ये वनविभागाच्या पथकाने आज छापा टाकला. वनविभागाला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. हे दुकान दीपक सुरेश चांदवडकर यांचे आहे. या दुकानात सुकामेवा, काष्ट औषधी, वनस्पती, आयुर्वेदिक वस्तू विक्रीसाठी आहेत.
वनविभागाच्या पथकाला या छाप्यामध्ये दुकानात विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांचे अवयव आढळून आले आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ आणि कलम ३९ चा भंग झाल्याचे स्पष्ट होत आहे. याची दखल घेत दुकानाचे मालक दीपक चांदवडकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुकानात आढळलेले वन्य प्राण्यांचे अवयव कोणत्या प्राण्यांचे आहेत, ते दुकानात कसे आले, कुणी आणले, त्याची खरेदी-विक्री केली जाते का, कधीपाहून हा प्रकार सुरू आहे, आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वनविभागाने तपास सुरू केला आहे. त्यासाठी एका पथकाचीही नियुक्ती केल्याचे सांगितले जात आहे.
Nashik Dagadu Teli Shop Forest Department Team Raid