नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यांचे काम अभिनंदनीय आहे. तसेच शासनाने समाजातील सर्व घटक केंद्रीत करुन त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाझे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपायुक्त मंजिरी मनोलकर, उपायुक्त राणी ताटे आदिसह विविध मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे पुढे म्हणाले की, महिला सक्षमीकरण हे शासनाचे महत्त्वाकांक्षी धोरण आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रूपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेचे सात लाख 16 हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला साधारण सोळा ते सतरा लाख महिला प्रवाशांनी लाभ घेतला. तसेच गौरी गणपतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’च्या साठी जवळपास आठ लाख 36 हजार किटची मागणी करण्यात आली असल्याचे यावेळी श्री.भुसे यांनी सांगितले.
मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून 3 गॅस सिलेंडरचे मोफत पुनर्भरण अशा अनेक योजनांतून माता भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून रोजगार इच्छुकांना विद्यावेतनासह शिकाऊ उमेदवारी दिली जात असून त्यासाठी जिल्ह्यात जवळपास दहा हजार रिक्त पदांसाठी पाच हजारहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तसेच, गेल्या दोन वर्षात सर्व विभागांच्या अनुकंपा तत्वावरील साधारण साडेसातशे उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली , असेही श्री भुसे यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता देताना जिल्ह्यातील सव्वा चार लाखहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास 89 कोटी एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे. जवळपास 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारण 497 कोटी 91 लाख रूपये रक्कम डीबीटी मार्फत अपलोड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आजअखेर पावणेदोन लाखहून अधिक लाभार्थींना शंभर कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे.
पालकमंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून जिल्ह्यातील 52 हजार 834 आयुष्यमान गोल्डन कार्डधारकांना लाभ देण्यात आला. यासाठी 107 कोटी 48 लक्ष रुपये अदा करण्यात आले आहेत.
सुपर फिफ्टी या नाविन्यपूर्ण उपक्रमातून ग्रामीण भागातील 7 परीक्षार्थींनी जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेत यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचे पालकमंत्री श्री.भुसे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत, पाणीपुरवठा योजना, पथदिवे व अधिनस्त कार्यालये यांच्या वीजबिल बचतीसाठी एक मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला नाविन्यपूर्ण योजनेखाली मान्यता देण्यात आली आहे. तसेच महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी 80 विक्री केंद्रे व 102 उमेद मार्टसाठी सात कोटींचा निधी देण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून 92 जिल्हा परिषद शाळांना सौर उर्जेद्वारे वीज पुरवठ्यासाठी पावणे सात कोटीहून अधिक रकमेच्या निधीला मान्यता दिली असल्याचेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस आयुक्त कार्यालयास सव्वा सहा कोटींच्या निधीतून 62 चारचाकी व 48 दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, नाशिक ग्रामीण पोलीस दलाकरिता एकूण 20 चारचाकी व 75 दुचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. नाशिक शहर पोलीस आस्थापनेवर 118 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली असल्याचे पालकमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.
घरोघरी तिरंगा अभियानात आठवडाभर विविध उपक्रम राबवले गेले. यातून देशभरात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी नव्या पिढीत आत्मियता निर्माण केली गेली. भारताला वैभवशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपण सर्वजण कटिबध्द होऊया, असे आवाहन यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नागरिकांना केले.
कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
यांचा झाला सत्कार व सन्मान :-
➡️ सैन्यातील उल्लेखनीय शौर्याबदद्ल ‘मेन्शन इन डिस्पॅच’ शौर्य पदक पुरस्कार प्राप्त अजय मारूती कदम, यांना महाराष्ट्र शासनातर्फे व मुख्यमंत्री सहायता कारगील निधीतून सहा लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आला.
➡️पोलीस आयुक्तालय,नाशिक शहर यांचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी यांनी उल्लेखानिय व गुणवत्तापुर्ण सेवा बजाविले बाबत राष्ट्रपतीचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.यावेळी दत्तु रामनाथ खुळे – पोलीस उपनिरीक्षक (राष्ट्रपती पदक), शगणेश मनाजी भामरे – पोलीस उपनिरीक्षक (राष्ट्रपती पदक) दिपक नारायण टिल्लु – पोलीस अंमलदार (राष्ट्रपती पदक) यांचा सत्कार करण्यात आला.
➡️ पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण यांचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी यांनी उल्लेखानिय व गुणवत्तापुर्ण सेवा बजाविले बाबत राष्ट्रपतीचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. यावेळी राजु संपत सुर्वे-पोलीस निरीक्षक (राष्ट्रपती पदक), बंडू बाबुराव ठाकरे – पोलीस उपनिरीक्षक (राष्ट्रपती पदक), मोनीका सॅम्युएल थॉमस – पोलीस उपनिरीक्षक (राष्ट्रपती पदक) अरुण निवृत्ती खैरे – पोलीस हवालदार (राष्ट्रपती पदक) यांचा सत्कार करण्यात आला.
➡️मा.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे विशाल नाईकवाडे,तहसिलदार निफाड, सचिन भास्करराव शिंदे, बाल विकास अधिकारी ,चांदवड ग्रामिण यांचा सत्कार करण्यात आला
➡️मा.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सर्वात जास्त उमेदवार नियुक्त देण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.नाशिक यांचा सत्कार करण्यात आला.
➡️राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम पाचवा टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बेस्ट ए.आर.टी. सेंटर अवॉर्ड सन 2023-2024 जिल्हा रूग्णालय नाशिक यांना प्रदान करण्यात आला. यासाठी मेहनत घेणारे डॉ.सुनिल ठाकूर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
➡️पुर्व उच्च प्राथमिक (इ.5वी) / पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) फेब्रुवारी 2024 मध्ये स्पृहणीय यश संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यामध्ये अर्नव सुदर्शन सुरसे, संस्कार गणेश साळी, विश्वजीत श्रीकांत देवरे, धृव मच्छिंद्र बोरसे, भार्गवी नंदकुमार जाधव, सर्वेश संदिप भावसार, अनुष्का प्रशांत सोनवणे, अरीत प्रशांत चोपडा.