नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – नाशिकची सायकलपटू हृतीका गायकवाडच एशियन गेम्स एमटीबी सायकल स्पर्धेसाठी निवड झाली असून तिच्या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानता तुरा खोवला गेला आहे. विशेष एशियन गेम्स मध्ये नाशिकच प्रतिनिधित्व करण्यासाठी जात असलेल्या हृतीका गायकवाडला राधालक्ष्मी फाउंडेशन, एपीआय हेमंत नागरे यांच्यासह नाशिककर दात्यांनी मदतीचा हात दिल्याने तिच्या स्वप्नांना अधिक बळ मिळालं आहे.
नाशिकची सायकलपटू हृतीका गायकवाडची घरची परिस्थिती ही अतिशय हलाकीची आहे. या परिस्थितीवर मात करून तिने एशियन गेम्स मध्ये आपले स्थान पक्क केलं आहे. तिला या स्पर्धेसाठी सायकलसह, हेल्मेट, बूट व इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सुमारे सहा लाखांहून अधिक रकमेची गरज होती. यासाठी सर्वप्रथम नाशिकच्या क्राईम ब्रांच विभागातील सहायक पोलीस निरिक्षक हेमंत नागरे यांनी तिच्या सायकल खरेदीसाठी मदतीचा हात देऊ केला. त्यानंतर माजी नगरसेवक अॅड.तानाजी जायभावे यांच्या माध्यमातून राधालक्ष्मी फाउंडेशनच्या अॅड.अश्विनी देशपांडे यांच्या माध्यमातून तिच्या सायकलसह इतर आवश्यक वस्तूंसाठी मदत गोळा करण्यात आली. नुकताच हॉटेल सिबल येथे झालेल्या छोटेखानी सोहळ्यात तिला सायकलसह मदत सुपूर्त करण्यात आली.
एशियन गेम्स मध्ये नाशिकच प्रतिनिधित्व करण्यासाठी हृतिका गायकवाड जात असल्याने नाशिक मधील अनेक दात्यांनी तिला एकत्र येऊन मदतीचा हात दिला आहे. तसेच डॉ.शेफाली भुजबळ, मनोहर देशपांडे, तुकाराम नवले, उमेश वानखेडे, हेमंत देशपांडे, मोनालिसा जैन, मकरंद सावरकर, सागर मुंदडा, समीर रकटे यांच्यासह अनेक नाशिककर मान्यवरांनी तिला सहकार्य लाभले आहे.
नाशिकच्या २२ वर्षीय हृतिका गायकवाड हिने आतापर्यंत राज्य आणि देशपातळीवर झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक पटकवले आहेत. एशियन गेम्स मध्ये भारतातून केवळ दोन महिला खेळाडूंची निवड झाली असून त्यामध्ये हृतिका गायकवाड हिचा समावेश आहे. १० सप्टेंबर २०२३ रोजी ती या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. तिच्या पंखाना अधिक बळ देण्यासाठी अजून नाशिककर दात्यांनी पुढे येऊन तिला मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. हृतिका गायकवाडला नाशिककरांकडून मिळालेल्या मदतीबद्दल तिने आयोजित कार्यक्रमात सर्व दात्यांचे आभार मानले आहे. तसेच या स्पर्धेसाठी अधिक मेहनत घेऊन या स्पर्धेत देशासाठी मेडल मिळवणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. यावेळी तिचे प्रशिक्षक मनोज महाले यांच्यासह कुटुंबातील सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.