नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टेलिग्रामवरुन वर्क फ्रॉम होमचे टास्क देऊन सिडको भागातील खुटवड नगर येथील एका महिलेला तब्बल १८ लाख रुपयाचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या महिलेला प्रश्नावली देऊन बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये २४ बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महिलेने वर्क फ्रॉम होम करा आणि काही दिवसात लाखो रुपये कमवा, अशी जाहिरात मोबाईलवर बघितली. त्यानंतर तीने याबाबत माहिती घेत या लिंकवर जाऊन संपूर्ण माहिती भरुन जाहिरातीला प्रतिसाद दिला. त्यानंतर या महिलेला एका बँक खात्यावर ऑनलाईन पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर प्रश्नावली पाठवण्यात आली. त्यानंतर टेलिग्रामच्या खात्यात रिव्ह्यू पूर्ण केल्याचे गुण दाखवून बदल्यात रक्कम क्रेडिट होत असल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर या महिलेने ३ ते २७ मार्च या कालावधीत विविध २४ बँक खात्यांवर एकूण १८ लाख १८ हजारांची रक्कम भरली. त्यानंतर ही फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सर्व बँक खात्यांची चौकशी करीत आहेत.